राममंदिराचे बांधकाम सुरू होईपर्यंत संपूर्ण हिंदू समाज कदापि स्वस्थ बसणार नाही – सरसंघचालक

नागपूर- हिंदूंचा संयम आता संपत असून जोपर्यंत अयोध्येत राममंदिराचे बांधकाम सुरू होत नाही तोपर्यंत संपूर्ण हिंदू समाज कदापि स्वस्थ बसणार नाही, असा इशारा सरसंघचालक मोहन भागवत यांनी येथे आयोजित हुंकार सभेतून केंद्र सरकारला दिला. राममंदिरासाठी सरकारने कायदा करावा, अशा शब्दांत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने केंद्र सरकारला ठणकावले. पुढे भागवत म्हणाले, मीच संयम ठेवण्यास वर्षभरापूर्वी सांगत होतो. पण न्यायालयाची प्राथमिकता आता नसल्याने न्याय लांबत चालला आहे.

राममंदिर हिंदू समाज सहिष्णू व कायद्याचा सन्मान करणारा असल्यानेच ३० वर्षे होऊनही होऊ शकले नाही. तो धीर आता सुटत आहे. न्यायालयात जनहिताच्या नावाखाली सुनावणी टाळणे कितपत योग्य आहे? या विलंबामुळे यापुढे जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाइड हे शिकवू नये, असे ते म्हणाले. सर्वोच्च न्यायालयाजवळ दिवाळीत फटाके फोडण्याची वेळ ठरवणे, सबरीमाला मंदिर, समलैगिक संबंधांच्या विषयावर (एलजीबीटी समूह) सुनावणी घेण्यास वेळ आहे. पण राममंदिरासारखा जनतेच्या आस्थेचा विषय महत्वाचा वाटत नाही. राममंदिर हा देशासमोरील प्राधान्याचा विषय नाही, असे सांगत मुख्य न्यायाधीशांनी सुनावणी पुढे ढकलली, अशा भावना या सभेत संघनेत्यांनी व्यक्त केल्या.

Leave a Comment