जपानमध्ये दोन हजार ब्रेड स्लाईसेस वापरून साकारली ‘मोनालिसा’

monalisa
लियोनार्डो द विंची या जगप्रसिद्ध चित्रकाराची चित्राकृती ‘मोना लिसा’ सध्या पॅरीस येथील ‘लूव्र’ संग्रहालयामध्ये आहे. या चित्रामध्ये मोना लिसाच्या चेहऱ्यावर असलेले स्मितहास्य नक्की कोणत्या कारणामुळे असेल, हे ओळखण्याचे अनेक प्रयत्न जगभरातील अनेक आर्ट हिस्टोरीयन्स, समीक्षक आणि अनेक हौशी कलासक्त मंडळींनी केला आहे. तिच्या चेहऱ्यावरील रहस्यमयी, गूढ स्मितहास्यामुळेच ‘मोना लिसा’ जगप्रसिद्ध कलाकृती ठरली आहे. अश्या या ‘मोना लिसाची’ हुबेहूब प्रतिकृती जपानमध्ये तीस विद्यार्थ्यांनी अथक परिश्रमांनी साकारली.
monalisa1
फुकुओका येथील ‘कुकिंग आणि कन्फेक्शनरी स्कूल’ च्या विद्यार्थ्यांनी सुमारे दोन हजारांच्या पेक्षा जास्त ब्रेडचे स्लाईसेस वापरून ही प्रतिकृती तयार केली आहे. ही प्रतिकृती तयार करण्यास या विध्यार्थ्यांना दोन महिन्यांचा कालावधी लागला. ‘नाकामुरा कलिनरी स्कूल’च्या वार्षिक महोत्सवाच्या वेळी ही प्रतिकृती प्रदर्शित करण्यात येणार आहे. ही प्रतिकृती ७.८ फुट उंचीची असून, १.५ मीटर रुंद आहे.
monalisa2
हे प्रतिकृती बनविण्यासाठी काळा आणि पांढरा अश्या दोन रंगांचे ब्रेड वापरण्यात आले होते. पांढरा ब्रेड मैद्याचा वापर करून, तर काळा ब्रेड मैद्यामध्ये कोको पावडरचा वापर करून तयार करण्यात आला होता. या दोन्ही रंगांच्या ब्रेडच्या लाद्या तयार करण्यात आल्यानंतर, यांचे स्लाईसेस करण्यात येऊन, यांच्या कडा कापून टाकून, हा ब्रेड वाळविण्यात आला. त्यानंतर एका मोठ्या प्लायवर या स्लाईसेसचे तुकडे मांडत मोनालिसाची प्रतिकृती तयार करण्यात आली. या चित्रामध्ये असलेल्या निरनिराळ्या छटा साकारण्यासाठी काळ्या आणि पांढऱ्या रंगांचा ब्रेड वापरला गेलाच, पण त्याशिवाय पांढऱ्या ब्रेडच्या स्लाईसेसना हवा तसा रंग येईपर्यंत भट्टीमध्ये भाजून घेऊन त्यांचा वापर करण्यात आला असल्याचे, ही प्रतिकृती साकारणाऱ्या विद्यार्थांच्या प्रतिनिधीने सांगितले आहे.

Leave a Comment