ही महिला आहे भारताची ‘लेडी शेरलॉक होम्स’

detective
मुंबनगरीच्या रहिवासी असणाऱ्या श्रीमती रजनी पंडित या भारतातील प्रथम महिला डीटेक्टीव्ह म्हणून प्रसिद्ध आहेत. एखाद्या घटनेचा शोध घेऊन योग्य निदानापर्यंत पोहोचण्याचे कौशल्य अंगी असणाऱ्या, आणि त्यासाठी जंग जंग पछाडून स्वतःचे प्राण धोक्यात घालावयासही मागेपुढे न पाहणाऱ्या रजनी यांना ‘भारताची लेडी शेरलॉक’ म्हणून ही संबोधले जाते. अलीकडेच ‘ह्युमन्स ऑफ बॉम्बे’ या फेसबुक पेजसाठी बोलत असताना रजनी यांनी, त्यांनी सोडविलेल्या आतापर्यंतच्या सर्वात कठीण केसबद्दलच्या आठवणींना उजाळा दिला. त्याचबरोबर महिला डीटेक्टीव्ह म्हणून कामाला सुरुवात करतानाचे आपले अनुभवही त्यांनी कथन केले. फेसबुकने शेअर केलेल्या त्यांच्या या पोस्टला, काही तासांच्या अवधीतच एक हजाराहून जास्त शेअर मिळाले आहेत.
detective1
रजनी पंडित यांनी त्यांची पहिली केस वयाच्या बाविसाव्या वर्षी सोडविली. त्यांचे वडील पोलीसखात्यामध्ये असल्याने एखाद्या गुन्ह्याचा माग काढण्याचे कसब रजनी यांच्याकडे ओघानेच आले. सुरुवातीला रजनी डीटेक्टीव्ह म्हणून कार्यरत असल्याची कल्पना त्यांच्या पालकांना देखील नव्हती. पण त्यांचे हे कसब जसजसे लोकांच्या समोर येऊ लागले तसतशी त्यांना प्रसिद्धी मिळू लागल्याचे रजनी म्हणतात. या पोस्टमध्ये, रजनी यांच्या आजवरच्या कारकीर्दीमध्ये त्यांनी सोडविलेल्या सर्वात कठीण केसचाही उल्लेख आहे. ही केस म्हणजे दुहेरी हत्येचे प्रकरण असून, या केसची उकल करण्यासाठी रजनी यांनी, आपण मोलकरीण असल्याचे भासवीत, संशयित महिलेच्या घरी तब्बल सहा महिने मुकाम ठोकला होता.
detective2
त्यावेळी आपल्यासोबत रजनी सतत टेप रेकॉर्डर ठेवत असत, जेणेकरून महिलेची सर्व संभाषणे ध्वनीमुद्रित करून त्यामधून केस संबंधी माहिती मिळविणे शक्य होऊ शकेल. पण एके दिवशी घरामध्ये संपूर्ण शांतता असताना रजनीच्या रेकॉर्डर मधून ‘क्लिक’ असा आवाज आला, आणि रजनी यांचे खरे रूप, संशयित महिलेच्या समोर येण्याचा धोका उत्पन्न झाला. त्यानंतर या महिलेचा रजनी यांच्यावर सतत संशय असून, रजनी यांना घराबाहेर पडण्यास मनाई करण्यात आली होती. इतका धोका पत्करूनही रजनी यांनी धीर न सोडता अखेर गुन्ह्याचा छडा लावला संशयित महिलेला पकडवून देऊन, ही केस यशस्वीरित्या सोडविली.
detective3
आजवर ‘लेडी शेरलॉक’ रजनी यांनी ऐंशी हजार केसेस सोडविल्या आहेत. त्यांच्या या कामगिरीबद्दल अनेक सन्मानांनी त्यांना नावाजले गेले आहे. आपलली ही धाडसी आणि हटके आयुष्यगाथा रजनी यांनी पुस्तकरूपाने प्रसिद्ध केली आहे. आपले अनुभव कथन करणारी दोन पुस्तके रजनी यांनी लिहिली असून, त्यांना चांगला प्रतिसाद मिळाला आहे. रजनी यांची पोस्ट सोशल मिडियावर व्हायरल झाल्यानंतर त्यांच्या कामाचे कौतुक करणाऱ्या अनेक पोस्ट्स पहावयास मिळत आहेत. रजनी यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपट बॉलीवूडमध्ये बनविला जावा असा आग्रह करणाऱ्या देखील अनेक पोस्ट्सचा यांमध्ये समावेश आहे.

Leave a Comment