सरकारी बँकांची 20 टक्के थकीत कर्जे केवळ 20 थकबाकीदारांकडे!

देशातील सरकारी बँकांची 20 टक्के बुडीत कर्जे केवळ 20 सर्वात मोठ्या थकबाकीदारांकडे आहेत, अशी कबुली भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) दिली आहे. या थकबाकीदारांकडे 2.36 लाख कोटी रुपयांचे कर्ज शिल्लक आहे.

डीएनए मनीने माहिती अधिकार कायद्यांतर्गत मागविलेल्या माहितीतून ही आकडेवारी समोर आली आहे. आरबीआयने दिलेल्या माहितीनुसार, भारतीय बँकिंग व्यवस्थेत 31 मार्च 2018 पर्यंत एकूण 10.2 लाख कोटी रुपयांची थकीत कर्जे आहेत. विशेषतः सरकारी नियंत्रण असलेल्या बँकांमध्ये कर्जाची जोखिम जास्त असल्याचेही आरबीआयने म्हटले आहे.

सार्वजनिक क्षेत्रातील बँकांकडे एकूण थकीत कर्जापैकी सर्वात मोठ्या 20 थकबाकीदारांकडे असलेल्या कर्जाचे प्रमाण 50 टक्के आहे, तर खासगी बँकांकडे सर्वात मोठ्या 20थकबाकीदारांकडे असलेल्या कर्जाचे प्रमाण 34 टक्के आहे, असे आरबीआयने म्हटले आहे.

केंद्र सरकारने 500 कोटी रुपये किंवा त्यापेक्षा अधिक कर्ज अद्याप थकीत असलेल्यांची नावे आणि सद्यस्थिती जाहीर करण्याचे आणि त्यांच्यावर नजर ठेवण्याचे आदेश सरकारी बँकांना दिले आहेत. या कर्जदारांनी थकीत कर्जे फेडण्यासंदर्भात काय पावले उचलली आहेत आणि आतापर्यंत किती वेळा कर्जफेडीसाठी बँकांनी त्यांच्याशी संपर्क साधला आहे, तसेच त्यावर त्यांचे उत्तर काय होते, याचीही माहिती सरकारने ऑगस्ट महिन्यात मागवली होती.

Leave a Comment