यंदाचे म्हणजे २०१८ चे वर्ष शेअर बाजारासाठी अतिशय अनिश्चितेतेचे ठरले असून शेअर बाजार सतत वरखाली होत राहिल्याने जगातील धनकुबेराना मोठे नुकसान सोसावे लागले आहे. त्यातही जगातील श्रीमंत व्यक्ती मध्ये सामील असलेल्यांना नुकसानीचा मोठा फटका बसला असल्याचे दिसून आले आहे. अब्जावधी डॉलर्सचे नुकसान सोसावे लागलेल्या श्रीमंतात एकमेव भारतीय आहे, चार चीनी आहेत तर बाकीचे अमेरिकन आणि १ जर्मन आहे.
या धनकुबेराना या वर्षात गमवावे लागले अब्जावधी डॉलर्स
फेसबुकचा संस्थापक मार्क झुकेरबर्ग याची एकूण संपत्ती ५३.५ अब्ज डॉलर्स असून त्याला सर्वाधिक म्हणजे १९.३ अब्ज डॉलर्सचे नुकसान शेअर मुळे झाले आहे. फेसबुकच्या सह संस्थापक एडवार्डो स्वीरीन याच्या ७.३५ अब्ज संपत्तीत त्याला २.२२ अब्ज डॉलर्सचे नुकसान झाले आहे तर फेसबुकचाच सहसंस्थापक दस्तीन मोर्कोवितझ याची एकूण संपत्ती १०.१ अब्ज डॉलर्स असून त्याला २.१० अब्ज डॉलर्सचे नुकसान झाले आहे.
चीनी टेनसेंट होल्डिंगचा सहसंस्थापक पोनी मा याची एकूण संपत्ती ३०.१ अब्ज डॉलर्स असून शेअर बाजारामुळे त्याला १०.९ अब्ज डॉलर्सचे नुकसान झाले आहे तर अलिबाबा चा जॅक मा याला ७.३ अब्ज डॉलर्स नुकसान झाले आहे. त्याची एकूण संपत्ती आहे ३८.१ अब्ज डॉलर्स. चीन ऑनलाईन गेम ऑपरेटर नेटइजचा सीइओ विलियम डिंग यांची एकूण संपत्ती आहे १३.९ अब्ज डॉलर्स आणि त्याला गमवावे लागले आहेत ६.४७ अब्ज डॉलर्स. चीनी सर्च इंजिन बैडू डॉट कॉमचा संस्थापक ली याला ३.५७ अब्ज डॉलर्स गमवावे लागले असून त्याची संपत्ती आहे १३.२ अब्ज डॉलर्स.
अमेरिकेच्या पेटीव्ही सर्विस कंपनी डिश नेटवर्क चेअरमन चार्ली एरगन ची संपत्ती १०.९ अब्ज डॉलर्स असून शेअर बाजारामुळे त्याला ४.९ अब्ज डॉलर्सचे नुकसान झाले आहे. जर्मन इंटरनेट सेवा युनायटेड इंटरनेटचा सीईओ राफ डोमार्मुथ याची संपत्ती ३.९१ अब्ज डॉलर्स असून त्याला २.०८ अब्ज डॉलर्स गमवावे लागले आहेत.
भारताच्या विप्रोचे प्रमुख अजीज प्रेमजी यांची संपत्ती १६.१ अब्ज डॉलर्स असून त्यांना शेअर बाजारामुळे १.८२ अब्ज डॉलर्सचे नुकसान सोसावे लागले आहे.