भाजपच्या महापौरांवर मुंढेंच्या बदलीनंतर फटाके वाजविल्याप्रकरणी दाखल होणार गुन्हा ?

नाशिक – आयुक्तपदावरुन तुकाराम मुंढे यांची बदली करण्यात आल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांना महापौरांच्या ‘रामायण’ बंगल्यासमोर फटाके फोडणे महागात पडण्याची चिन्हे आहेत. महापौर रंजना भानसी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांविरोधात सर्वोच्च न्यायालयाने फटाक्यांसदर्भात दिलेल्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी ‘आम्ही नाशिककर’ या संघटनेतर्फे करण्यात आली आहे.

नाशिकच्या आयुक्तपदावरुन गुरुवारी तुकाराम मुंढे यांची करण्यात आली. यासंदर्भातील आदेश शुक्रवारी प्राप्त झाल्यानंतर मुंढे यांनी क्षणाचाही विलंब न करता खिन्न मनस्थितीत पालिका मुख्यालय सोडले. पालिकेतून मुंढे हे निघून गेल्यानंतर सत्ताधारी-विरोधी सदस्यांकडून आनंदोत्सव सुरू झाला. महापौरांच्या ‘रामायण’ बंगल्यासमोर भाजपच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडले होते. ‘आम्ही नाशिककर’ या संघटनेने याविरोधात पोलिसांकडे धाव घेतली आहे.

फटाके फोडण्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिले होते. भाजपच्या महापौर रंजना भानसी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी या आदेशाचे उल्लंघन केले आहे. सर्वसामान्यांकडूनही याचे अनुकरण केले जाऊ शकते. त्यामुळे संबंधितांविरोधात गुन्हा दाखल करावा, असे पत्रक संघटनेच्या वतीने शुक्रवारी पोलिसांना देण्यात आले आहे. यासंदर्भात योग्य ती कारवाई केली जाईल, असे आश्वासन पोलिसांनी संघटनेच्या शिष्टमंडळाला दिले आहे. त्यामुळे फटाके फोडणे हे आता भाजप कार्यकर्त्यांना चांगलेच महागात पडू शकते.

Leave a Comment