अभिजित बोस यांची व्हॅाट्सअॅपच्या भारत प्रादेशिक प्रमुखपदी नियुक्ती

whatsapp
मुंबई – अभिजित बोस यांना भारतातील व्हॅाट्सअॅपचा कारभार बघण्यासाठी फेसबुकची मालकी असलेल्या व्हॅाट्सअॅपने प्रमुखपदी नियुक्त केले आहे. भारतीय मोबाईल ई- पेमेंट कंपनी ईझीटॅपचे अभिजित बोस हे सहसंस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत.

पहिल्यांदाच व्हॅाट्सअॅपने प्रादेशिक विभागात प्रमुखपदी कोणाची तरी नियुक्ती केली आहे, असे कंपनीने सांगितले. व्हॅाट्सअॅप वापरकर्त्यांची संख्या भारतात सुमारे २० कोटी आहे. ग्राहकांची सगळ्यात मोठी बाजारपेठ असल्याने भारतातील कारभार बघण्यासाठी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. व्हॉट्सअॅपवर भारत सरकारने प्रादेशिक गट बनविण्यासाठी दबाव टाकला होता. अमेरिकी कंपनी व्हॅाट्सअॅपला भारत सरकारने फेक न्यूज आणि प्रक्षोभक मजूकरासंदर्भात पावले उचलण्याची विनंती केली होती. भारतात अनेक हत्याकांड व्हॅाट्सअॅपवरील मजकुराने झाले आहेत. तसेच व्हॅाट्सअॅवरील संदेशामुळे जमावाने हल्ला केल्याच्या घटना घडल्या होत्या. व्हॅाट्सअॅप फेक न्यूज आणि खोटी माहिती रोखण्याचे प्रयत्न करत आहे. त्या पार्श्वभूमीवर बोस यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

व्हॅाट्सअॅपचा भारतीय ऑनलाईन पेमेंट बाजारामध्ये शिरकाव करण्याचा निर्धार अभिजित बोस यांच्या नियुक्तीने पक्का असल्याचे स्पष्ट झाले आहे. भारतात व्हॅाट्सअॅप ऑनलाईन पेमेंट सेवेची चाचणी करत असून रिजर्व बँकेच्या परवानगीच्या प्रतिक्षेत आहे. बोस आपला कारभार २०१९ च्या आरंभापासून पाहणार आहेत.

Leave a Comment