राजस्थानातील थार वाळवंटाच्या सीमेवर असलेल्या रणथंबोरचे नाव घेतले कि सर्वप्रथम आपल्याला आठवते रणथंबोरचे राष्ट्रीय उद्यान आणि तेथील व्याघ्रप्रकल्प. येथे वाघांना नैसर्गिक वातावरणात पाहण्याचा अनुभव घेता येतो त्यामुळे अनेक पर्यटक रणथंबोर अभयारण्याला आवर्जून भेट देतात. येथे व्याघ्र दर्शन आणि निसर्गाचा मनमुराद आनंद लुटताना अन्य प्रेक्षणीय ठिकाणे आवर्जून पाहायला हवीत. त्यात चुकवू नये तो रणथंबोरचा किल्ला.
वाघ बघायला जाल तेव्हा रणथंबोरचा किल्ला अवश्य पहा
उंच पहाडावर १0 व्या शतकात राजस्थानच्या चौहान शासकांनी बांधलेला हा किल्ला अनेक युद्धे अनुभवलेला आणि म्हणून महत्वाचा आहे. ७ किमी परिसरात हा किल्ला पसरलेला असून लढाई आणि रणनीतिक दृष्टीने बांधला गेला आहे. हा किल्ला सहजी जिंकता येणारा नाही अशी त्याची बांधणी आहे.
किल्ल्यातील हम्मीर फोर्ट आवाजाच्या खुबीची जाणीव करून देतो. येथे महाप्रचंड दरबाराच्या एका कोपऱ्यात थोडीशी कुजबुज केली तरी तरी दरबाराच्या लांबच्या दुसऱ्या कोपऱ्यात स्पष्ट ऐकू येते. येथे अनेक मंदिरे असून प्रचंड आकाराचे दरवाजे आणि उंच भिंती आहेत. या किल्ल्याने अनेक युद्धे पहिली त्यातील प्रसिद्ध युद्ध म्हणजे दिल्लीचा अल्लाउद्दिन खिलजी आणि राव हमीर यांच्यात १३०१ मध्ये झालेले घनघोर युद्ध.