मध्य प्रदेशातील गोंड समाजात नाही एकही विधवा

gond
मध्य प्रदेशातील मंडला जिल्ह्यातील गोंड आदिवासी समाजात एकही विधवा महिला नाही. येथे विवाहित महिलांच्या नवऱ्यांचा मृत्यू होत नाही असे नाही तर या समाजातील प्रथेमुळे या महिला विधवा होत नाहीत. येथे अशी परंपरा आहे कि एखाद्या महिलेच्या नवऱ्याचा मृत्यू झाला तर त्याच परिवारातील तरुण पुरुषाशी तिचा विवाह लावून दिला जातो. यामुळे अनेकदा दिराबरोबर विवाह होतो तर काही वेळा नातवाबरोबर आजीचा विवाह झाल्याची उदाहरणेही दिसतात.

या समाजातील या प्रथांना देवर पाटो, नाती पाटो असे म्हटले जाते. पाटोचा अर्थ पाट लावणे किंवा पुनर्विवाह असा असावा. समजा परिवारात कुणी पुरुष राहिला नसेल तर त्या महिलेला चांदीच्या बांगड्या घातल्या जातात. नवरा मरण पावलेल्या १० दिवशी हा समारंभ होतो आणि त्या महिलेला विवाहित मानले जाते. दिराने या बांगड्या महिलेला घातल्या तर तो देवर पाटो, नातवाने घातल्या तर तो नाती पाटो होतो. या नंतर ते दोघे पती पत्नी प्रमाणे राहतात.

अर्थात यात दोघानाही शरीर संबंध ठेवणे बंधनकारक नसते मात्र दोघांची तशी इच्छा असेल तर त्याला समाज आडकाठी करत नाही. विशेष म्हणजे गावाबाहेर पडलेले लोकसुद्धा हि प्रथा आवर्जून पाळतात. शिकलेले तरुण तरुणी सुद्धा हि परंपरा जिवंत ठेवण्यास प्राधान्य देताना दिसतात.