मार्क झुकेरबर्ग फेसबुकमधून निवृत्तीबाबत काय म्हणाला ?

facebook
सॅन फ्रान्सिस्को – गुंतवणूकदारांनी फेसबुकचा संस्थापक आणि चेअरमन मार्क झुकेरबर्गने राजीनामा द्यावा, यासाठी त्याच्यावरील दबाव वाढविण्यास सुरुवात केली आहे. कारण गुंतवणूकदारांमध्ये फेसबुकमधून डाटा लिक होणे इत्यादी प्रकार घडल्याने कमालीची नाराजी आहे. मार्कने याबाबत पहिल्यांदाच अमेरिकन माध्यमांशी बोलताना निवृत्त होण्याचा कोणताही विचार नसल्याचे स्पष्ट केले.

मंगळवारी अमेरिकन माध्यमाला मार्क झुकेरबर्गने मुलाखत दिली. झुकेरबर्ग यात म्हणाला की, जुलैपासून फेसबुकच्या शेअरमध्ये ४० टक्के घसरण झाली असताना फेसबुक सोडण्याची ही योग्य वेळ नाही. तसे नियोजनही नाही. कंपनीत मी कायमच राहणार नाही, पण फेसबुक कंपनी सोडून देण्यात सध्या काहीच अर्थ नाही. कंपनी मी चालवित असल्याने जे काही येथे घडते, त्यासाठी सर्वस्वी मी जबाबदार आहे. एखाद्या पीआर फर्मचा मुद्दा नाही. तर कसा प्रतिसाद आम्ही देतो, याचा मुद्दा आहे, असल्याचे मार्क मुलाखतीदरम्यान म्हणाला आहे.

फेसबुकने विरोध करणाऱ्यांविरोधात डिफायनर्स या पीआर कंपनीची सेवा घेऊन मोहीम आखली होती, असे एका माध्यमात वृत्त आले होते. फेसबुकने याबाबतचे आरोप फेटाळून लावले आहेत. झुकेरबर्गला चेअरमन पदावरुन पायउतार होण्यास ट्रिलियम असेट मॅनेजमेंटचे उपाध्यक्ष जॉनस क्रॉन यांनी सांगितले. अर्जुना कॅपिटलच्या नताशा लँब यांनीही फेसबुक ही कंपनीअंतर्गत समस्या टाळण्यात अपयशी ठरत असल्याचे म्हटले होते. रशिया ही अमेरिकेच्या निवडणुकीत हस्तक्षेप करत असल्याची माहिती फेसबुकला होती, असे वृत्त अमेरिकेतील एका माध्यमाने प्रसिद्ध केले होते. हे आरोपही फेसबुकने फेटाळले आहेत.

Leave a Comment