भाजपमध्ये राहूनच भाजपला शह देण्याचा आमदार गोटे यांचा प्रयत्न

anil-gote
धुळे – राजीनाम्यासाठी भाजप आमदार अनिल गोटे यांनी माघार घेतली असली तरी, धुळे महापालिका निवडणूक त्यांनी नव्याने स्थापन केलेला लोकसंग्राम पक्ष लढवणार असल्यामुळे भाजपमध्ये राहूनच भाजपला शह देण्याचा प्रयत्न गोटे यांनी सुरू केला असल्याची चर्चा सध्या जोर धरू लागली आहे. मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केल्यानंतर आमदार गोटे यांनी अचानक राजीनाम्याचे अस्त्र म्यान केले होते.

येत्या ९ डिसेंबरला धुळे महापालिका निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. विविध राजकीय घडामोडी धुळे महापालिकेची निवडणूक जाहीर झाल्यापासून घडत आहेत. भाजप विरुद्ध भाजप असा सामना या निवडणुकीत सुरू झाला आहे. धुळे शहराचे आमदार अनिल गोटे आणि खासदार डॉ. सुभाष भामरे यांच्यात २ गट पडल्यामुळे एकमेकांना शह देण्याचा प्रयत्न दोघे करत आहेत.

गोटेंच्या लोकसंग्राम पक्ष महापालिकेत सत्ता स्थापन करण्यासाठी एकवेळेस राष्ट्रवादी काँग्रेस किंवा शिवसेना अथवा इतर पक्षांची मदत घेतील पण भाजपला सत्तेपासून दुर ठेवतील हे गोटेंच्या बंडानंतर सिद्ध झाले आहे. गोटे यांच्या निवडणुकीबाबतच्या निर्णयानंतर मात्र, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

Leave a Comment