राणी एलिझाबेथ करणार सिंहासनाचा त्याग; पण का?

queen
ब्रिटनची राणी एलिझाबेथ हिने नुकतीच वयाची ९२ वर्षे पूर्ण केली आहेत. पण या वयामध्ये सर्व राजनैतिक, आणि सामाजिक जबाबदाऱ्या आजही एलिझाबेथ मोठ्या निष्ठेने पार पाडीत आहे. पण आता तिचे वय पाहता आणखी किती दिवस राणी राज्यकारभाराची धुरा सांभाळू शकणार आहे, याची चर्चा सर्वत्र सुरु आहे. त्यामुळे राणी सिंहासनाचा त्याग करून, राज्यकारभार तिचे थोरले पुत्र प्रिन्स चार्ल्स यांच्याकडे सुपूर्त करणार का, हा प्रश्न सर्वांच्याच मनामध्ये आहे. ब्रिटीश साम्राज्य अस्तित्वामध्ये येऊन एक हजार वर्षांपेक्षाही अधिक काळ लोटला आहे. या साम्राज्याच्या जोडीने अस्तित्वात आली, ती परंपरा, रूढी आणि राजघराण्याला लागू असलेले अनेक नियम. या नियमांचे, परंपरांचे पालन आजच्या काळामध्ये देखील कटाक्षाने केले जात असते. स्वतः राणी एलिझाबेथही याला अपवाद नाही. राज्यकारभाराची धुरा सांभाळणाऱ्या राजा किंवा राणीने शेवटच्या श्वासापर्यंत रयतेची सेवा केली पाहिजे हा देखील या परंपरेचाच एक भाग आहे.
queen1
राणी एलिझाबेथ गेली पासष्ट वर्षे राज्यकारभाराची धुरा सांभाळीत आहे. वयाची ९२ वर्षे पार केलेली एलिझाबेथ तिची जबाबदारी टाळत नसली, तरी वाढत्या वयापरात्वे तिचे शरीर मात्र थकत चालले आहे. पण तरीही राणी औपचारिक रित्या सिंहासनाचा त्याग करणार नसल्याचे बोलले जात आहे. सिंहासनाचा त्याग करणे, म्हणजे आपल्या जबाबदाऱ्यांपासून पाठ फिरविणे अशी मान्यता ब्रिटीश शाही परंपरेमध्ये रूढ असून, त्यामुळे राणी एलिझाबेथ सिंहासनाचा त्याग करणार नसल्याचे समजते. वयाच्या ९५ वर्षांपर्यंत जर राणी जिवंत राहिली, तर मात्र ‘रिजेन्सी अॅक्ट’ नुसार राज्यकारभाराची सूत्रे प्रिन्स चार्ल्स यांच्याकडे सुपूर्त करण्याचा विचार राणी करीत असल्याचे समजते. मात्र त्यावेळी प्रिन्स चार्ल्स हे ‘प्रिन्स रीजेंट’ म्हणून राज्यकारभाराची धुरा सांभाळतील आणि एलिझाबेथ तेव्हाही औपचारिक दृष्ट्या ब्रिटनची राणी असेल.
queen2
राणी एलिझाबेथने आपल्या काही सामाजिक आणि राजनैतिक जबाबदाऱ्या प्रिन्स चार्ल्स आणि तिचे नातू प्रिन्स विलियम आणि प्रिन्स हॅरी यांना सोपविण्यास सुरुवात केली असल्याचे समजते.

Leave a Comment