आयुक्त मुंढे यांना नगरसेविकांचा अंगणवाडी सेविकांच्या मागणीवरुन घेराव

tukaram-mundhe
नाशिक – महासभेत अंगणवाडी सेविकांना कामावर रुजू करुन घेण्याबाबतचा ठराव २ वेळा मंजुर होऊनही या प्रश्नाकडे आयुक्त तुकाराम मुंढे मात्र दुर्लक्ष करत असल्याचा आरोप महिला नगरसेविकांनी केला आहे. संतप्त महिला नगरसेवकांनी यामुळे नारीशक्तीचे दर्शन घडवत महापौर रंजना भानसी व आयुक्त मुंढे यांना घेराव घातला.

आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शहरातील १३० अंगणवाड्या विद्यार्थी पट संख्या ४० पेक्षा कमी असल्यावरुन बंद केल्या आहेत. २७० सेविका व मदतनिस यांच्यावर यामुळे बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे. आम्हाला पट संख्या वाढवण्यासाठी वेळ द्या म्हणत या अंगणवाडी सेविकांनी मागील ४ महिन्यांपासून आंदोलन सुरू केले आहे. याबाबत विद्यार्थी संख्या नसेल तर जिथे विद्यार्थी मिळतील तेथे अंगणवाडी भरवा, पण महिलांना रोजगार उपलब्ध करुन द्या, अशी मागणी करत थेट व्यासपीठावर नगरसेविकांनी ठाण मांडले.

तुकाराम मुंढे यांनी यावेळी आपल्या निर्णयावर ठाम राहण्याची भूमिका घेतली. दरम्यान, महिला व बालकल्याण सभापती कावेरी घुगे यांनी हा प्रश्न पुन्हा महासभेत उपस्थित केला होता. अंगणवाडी सेविकांना जोपर्यंत कामावर घेणार नाही, तोपर्यंत हटणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली. मुंढे यांनी त्यानंतर २० ते २५ पटसंख्या असलेल्या अंगणवाडी सेविकांबाबत विचार करू, असे सांगितले. पण त्यावर नगरसेविका समाधानी झाल्या नाही आणि नगरसेविकांची घोषणा बाजी सुरुच होती. अखेर महिला नगरसेविकांचा रोष बघून महापौर रंजना मानसी यांनी ३ महिन्यासाठी अंगणवाडी सेविकांना कामावर घ्या, असे आदेश दिल्यानंतर या वादावर पडदा पडला.

Leave a Comment