चित्तथरारक असा कंबोडियातील ‘वॉटर फेस्टिव्हल’

water
कंबोडियादेशामध्ये ‘वॉटर फेस्टिव्हल’, म्हणजे अतिशय चित्तथरारक अश्या जलोत्सवाची परंपरा अनेक शतकांपूर्वी सुरु झाली, ती आजतागायत तशीच सुरु आहे. चंद्रदेवतेला समर्पित या उत्सवामध्ये चंद्रमाच्या प्रती आपले आभार प्रकट करण्याची परंपरा या उत्सवामध्ये रूढ आहे. उत्तमोत्तम मंदिरांसाठी कंबोडिया हा देश जगभरामध्ये प्रसिद्ध आहे. या मंदिरांना भेट देण्यासाठी हजारो पर्यटक येथे येत असतात. या मंदिरांच्या सोबत अनेक सुंदर अरण्ये, विशालकाय जलाशय आणि निसर्गरम्य नदी किनारे यांनी कंबोडियाचा हा प्रदेश नटला आहे. त्याचबरोबर येथे रूढ असलेल्या अनेक चाली रिती, परंपरा आणि उत्सव पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरत आल्या आहेत. येथे साजरा केला जाणारा जलोत्सव त्यातील एक म्हणता येऊ शकेल.
water1
या उत्सवामध्ये नौकायन असतेच, पण नावांवर केले जाणारे अनेक खास नृत्य प्रकार या उत्सवाचे मुख्य आकर्षण असतात. मोठमोठ्या होड्या आणि त्यांवर झगमगणारी रोषणाई, उत्सवामध्ये आनंदाने सहभागी होणारे स्थानिक लोक आणि पर्यटक असे सुंदर दृश्य उत्सवाच्या काळामध्ये येथे पहावयास मिळते. ‘बॉन ओम टोक’ या नावाने साजरा केला जाणारा हा कंबोडियामधील जलोत्सव दरवर्षी नोव्हेंबर महिन्यामध्ये साजरा केला जातो. नोव्हेंबर महिन्यामध्ये हा उत्सव तीन दिवस सुरु राहतो. ‘कंबोडियातील ‘नॉम पे’ शहरातील राजवाड्याच्या जवळ हा उत्सव साजरा केला जातो.
water2
हा जलोत्सव सर्वप्रथम बाराव्या शतकामध्ये साजरा केला गेल्याचे म्हटले जाते. हा उत्सव अंगकोर राजे सातवे जयवर्मन यांच्या कारकीर्दीमध्ये सर्वप्रथम साजरा केला गेला. हा उत्सव देवतांना प्रसन्न करण्याच्या उद्देशाने साजरा केला जात असून, त्याच्या आशीवार्दाने शेतीचे आणि मासेमारीचे उत्पन्न चांगले व्हावे अशी प्रार्थना केली जात असते. या उत्सवामध्ये होड्यांच्या शर्यतींचे आयोजन केले जात असून, या उत्सवामध्ये चंद्राची पूजा केली जाते. नारळाच्या पाण्यामध्ये शिजविलेला विशेष प्रकारचा भात नैवेद्य म्हणून अर्पण करण्याची परंपरा या उत्सवामध्ये रूढ आहे. प्रशासनाच्या आणि काही खाजगी संस्थांच्या वतीने या उत्सवाचे आयोजन केले जात असते.
water3
या उत्सवामध्ये होणाऱ्या नावांच्या शर्यतींमध्ये भाग घेणारी दले, सरावासाठी काही दिवस आधीपासूनच येथे येऊन राहतात. कंबोडिया प्रशासनाच्या विविध मंत्रालयांच्या नावा देखील सुंदर सजावटीसह या उत्सवामध्ये सहभागी होत असतात. संध्याकाळच्या वेळी अतिशय सुंदर रोषणाई आणि तितकीच सुंदर आतिषबाजी देखील या ठिकाणी होत असते.

Leave a Comment