देशात अघोषित आणीबाणी सुरू असून, हिटलरशाही राबवली जात आहे – श्रीमंत कोकाटे

shrimant-kokate
हिंगोली – संभाजी बिग्रेडचे प्रवक्ते व इतिहास संशोधक श्रीमंत कोकाटे यांनी देश सद्यस्थितीला धोकादायक पातळीवर आहेच, त्याहूनही गंभीर बाब म्हणजे संविधानिक मूल्ये पायदळी तुडवली जात आहेत. तसेच देशात अघोषित आणीबाणी सुरू असून, हिटलरशाही राबवली जात असल्याचा आरोप केला आहे. हिंगोलीत ते पत्रकार परिषदेत बोलत होते. न्याय व्यवस्थेवरही सत्ताधार्‍यांनी अतिक्रमण केल्याने खुद्द सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायधीशांना पत्रकार परिषद घ्यावी लागल्याचेही कोकाटे म्हणाले.

देशात स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच अराजकतेची परिस्थिती निर्माण झाली आहे. लोकशाही सध्या सत्ताधार्‍यांच्या हिटलरशाहीला बळी पडली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच प्रसिध्दी माध्यमांसमोर न्याय व्यवस्था धोक्यात असल्याची कबुली द्यावी लागली आहे. जर आम्ही आज गप्प बसलो तर १५ वर्षांनी नवीन पिढी म्हणेल हे विकले गेले होते, असेही कोकाटे म्हणाले.

केंद्रातील मोदी सरकारची नोटबंदी बंदी फसली आणि अनेकांचे रोजगार त्यामध्ये बुडाले. शेतकरी दुष्काळात उत्पादन मुल्यावर भाव नसल्याने आत्महत्या करत आहे. सरकार याकडे दुर्लक्ष करत आहे. सीबीआयच्या संचालकाची एका रात्रीच बदली होते. महत्वाचे म्हणजे ही बदली पत्र देऊन नव्हे तर व्हाट्सअॅपवर संदेश पाठवून केली जाते. मराठा आंदोलनकर्त्यांची आत्महत्या नव्हे तर मुख्यमंत्री फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या हत्या असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. या सरकारला राम मंदिर करायचे नाही. केवळ त्या माध्यमातून दंगली घडवायच्या आहेत. असा आरोपही कोकाटे यांनी केला. यावेळी संभाजी बिग्रेडचे प्रदेश संघटक सुभाष बोरकर, डॉ. नामदेव कर्‍हाळे, गणेश शिंदे आदी उपस्थित होते.

Leave a Comment