लोकसभा-विधानसभेच्या सर्व जागा लढवणार ‘महाराष्ट्र क्रांती सेना’

kranti-sena
कोल्हापूर – नव्या महाराष्ट्र क्रांती सेना या राजकीय पक्षाची आरक्षणासाठी राज्यभर भव्य मोर्चे काढणाऱ्या मराठा क्रांती मोर्चाचे निमंत्रक सुरेश पाटील यांनी स्थापना केली. हा पक्ष आता आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक लढवणार असल्याची घोषणा कोल्हापूर येथे सोमवारी करण्यात आली.

यंदाच्या दिवाळीत रायरेश्वर येथे महाराष्ट्र क्रांती सेनेची स्थापना करण्यात आली. आगामी निवडणुकीत या पक्षाकडून राज्यातील लोकसभेच्या ४८ आणि विधानसभेच्या २८८ जागा लढवण्यात येणार असल्याची अधिकृत घोषणा सोमवारी कोल्हापूरात करण्यात आली. दरम्यान, जर राष्ट्रवादी काँग्रेसकडून साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले हे निवडणूक लढवणार नसतील तर महाराष्ट्र क्रांती सेनेकडून लढवतील अशी अपेक्षा आणि विश्वास पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात आली.

मराठा समाजाचाच मराठा क्रांती मोर्चातून निर्माण झालेल्या ‘महाराष्ट्र क्रांती सेना’ या पक्षाला विरोध असून मागण्या मान्य करून घेण्यासाठी समाज सक्षम आहे. कोणत्याही राजकीय पक्षाच्या यासाठी स्थापनेची गरज नाही. समाजाच्या आंदोलनाला राजकीय पक्ष स्थापून वेगळी दिशा देण्याचा कोणताही प्रयत्न यशस्वी होऊ दिला जाणार नाही. वेगळा राजकीय पक्ष स्थापन करणारे सरकारचे हस्तक असून त्यांची राजकीय उठबस व पार्श्वभूमी विचारात घ्यावी लागेल, असे मराठा क्रांती ठोक मोर्चाचे जेष्ठ पदाधिकारी बापूसाहेब शिरसाट व नानासाहेब माशेरे यांनी म्हटले होते.

Leave a Comment