जलाशयामध्ये आहे हजारो वर्षांपूर्वीचे गुप्त धन !

lake
या जगामध्ये अशी अनेक ठिकाणे आहेत, जिथे हजारो वर्षांपूर्वीपासून गुप्त धनाचे साठे असल्याच्या आखायिका प्रसिद्ध आहेत. भारतामध्ये देखील अशी अनेक ठिकाणे आहेत जिथे गुप्तधन असल्याचे म्हटले जाते. दक्षिण भारतातील पद्मनाभ स्वामी मंदिर हे अश्याच आख्यायिकेचे उदाहरण म्हणता येईल. आज आपण जाणून घेणार आहोत हिमाचल प्रदेशातील एका जलाशयाबद्दल. या जलाशयामध्ये गुप्त धन असल्याचे म्हटले जातेच, पण त्याशिवाय या गुप्त धनाचे रक्षण करणारा एक भला मोठा विषारी सर्पही या जलाशयामध्ये रहात असल्याची आख्यायिका प्रसिद्ध आहे.
lake1
हिमाचल प्रदेशातील हा जलाशय मंडी नामक गावापासून सुमारे साठ किलोमीटर अंतरावर असलेल्या रोहांदाच्या निबिड अरण्यामध्ये आहे. या जलाशयाला कामरूनाग या नावाने संबोधले जात असून, या जलाशयाच्या तळाशी कोट्यवधी रुपये किंमतीचे गुप्तधन असल्याचे म्हटले जाते. पण या गुप्तधनापर्यंत पोहोचण्याचे धाडस आजवर कोणीही करू शकलेले नाही. यामागचे कारण रोचक आणि आश्चर्य करायला लावणारे आहे. कामरुनाग जलाशयाच्या जवळच एक मंदिर देखील आहे. या मंदिरामध्ये दर्शनासाठी येणारे भाविक जलाशयामध्ये सोन्याचांदीचे अलंकार आणि पैसे अर्पण करीत असतात. ही परंपरा गेली अनेक शतके सुरु आहे. याच परंपरेमुळे आजवर कोट्यवधी रुपयांचा खजिना या जलाशयाच्या तळाशी जमा झाल्याचे म्हणण्यात येते.
lake2
या जलाशयामध्ये असणारे गुप्तधन हे देवतांचे असून, या धनाची रखवाली एक विशाल सर्प करीत असल्याची मान्यता आहे. त्यामुळे या गुप्तधनाच्या आशेने कोणी जलाशयामध्ये उतरल्यास हा विशालकाय सर्प त्या व्यक्तीला जिवंत सोडीत नसल्याचेही म्हटले जाते. याच कारणास्तव या जलाशयामध्ये उतरण्याचे धाडस आजवर कोणाचेही झाले नसल्याचे म्हटले जाते. या जलाशय खूप खोल असून यामधून एक भुयार पाताळ लोकामध्ये जात असल्याची ही आख्यायिका प्रसिद्ध आहे. कामरूनाग जलाशय आणि येथे असणारे मंदिर हे भाविकांची मनोकामना पूर्ण करणारे असल्याचे म्हटले जात असल्यामुळे अनेक भाविक येथे येऊन आपल्या मनोकामना पूर्ण होण्याचे साकडे घालीत असतात. मनोकामना पूर्ण झाल्यानंतर येथे येऊन जलाशयामध्ये सोन्याचांदीचे अलंकार अर्पण करण्याची परंपरा येथे रूढ आहे.

Leave a Comment