आता फॅशन ‘ह्युमन स्किन ज्वेलरी’ची

skin
सध्याच्या काळामध्ये आपण आपल्या वेशभूषेच्या बाबतीत अतिशय जागरूक झालो आहोत. त्यामुळे आताच्या पिढीची वेशभूषेच्या बाबतीतली जागरूकता, नवनव्या फॅशन्सची आवड आणि काहीतरी नवीन प्रयोग करून बघण्यातला उत्साह याच्या जोरावर अनेक ब्रँडस् सातत्याने नव्या डिझाइन्सचे कपडे, आणि दागिने बाजारामध्ये आणत असतात. दागिन्यांच्या बाबतीत बोलायचे झाले तर त्यामध्ये देखील ‘डेली वेअर’, म्हणजेच दररोज परिधान करता येतील असे अलंकार, आणि ‘फेस्टीव्ह वेअर’, म्हणजे काही खास कार्यक्रमांच्या किंवा सणासुदीच्या वेळी परिधान करण्याचे अलंकार असे निरनिराळे प्रकार रूढ झाले आहेत.
skin1
या दागिन्यांमध्ये सोने, चांदी, इतर धातू, हिरे या दागिन्यांचा समावेश असतो. मात्र या दागिन्यांच्या प्रकारांपासून ‘हटके’ असे अलंकार न्यूयॉर्क या ठिकाणी नुकतेच सादर करण्यात आले. न्यूयॉर्क फॅशन वीकमध्ये नुकतीच ‘ह्युमन स्किन ज्वेलरी’ सादर करण्यात आली. हे अलंकार मानवी त्वचेवर कोरल्याप्रमाणेच दिसत असून, या दागिन्यांनी फॅशन जगतामध्ये धमाल उडवून दिली आहे. न्यूयॉर्क येथील प्रसारमाध्यमांनी प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार अश्या प्रकारचे अलंकार लोकांना आकृष्ट करीत आहेत. त्याचप्रमाणे इन्स्टाग्राम आणि फेसबुक सारख्या सोशल मिडियामध्येही सध्या या अलंकारांच्या विषयी कुतूहल पहावयास मिळत आहे.
skin2
न्यूयॉर्क मध्ये आयोजित ‘फॅशन वीक’ मधील एका शोमध्ये हे अलंकार प्रदर्शित करण्यात आले होते. अनेक मॉडेल्सनी निरनिराळ्या प्रकारची स्किन ज्वेलरी परिधान करीत उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. मॉडेल्सच्या त्वचेशी मिळत्या जुळत्या पोताचे हे अलंकार असल्यामुळे शरीरावर प्लास्टिक सर्जरी करविल्या प्रमाणे हे अलंकार भासत होते. अश्या प्रकारची ह्युमन स्किन ज्वेलरी लवकरच लोकप्रिय होईल अशी खात्री ही ज्वेलरी डिझाईन करणाऱ्या डिझायनर्सना आहे.

Leave a Comment