न फाटणारी, न भिजणारी असेल १०० ची नवी नोट

100ru
आज म्हणजे सोमवारी रिझर्व बँकेच्या बोर्डाची बैठक होत असून त्यात नव्या १०० रु.च्या नोटेसंदर्भात महत्वाची चर्चा होणार आहे असे समजते. वार्निशचा थर दिलेली हि नवी नोट चलनात जारी करण्यास या बैठकीत मंजुरी दिली जाईल असे सांगितले जात असून त्यानंतर हि नोट ट्रायल साठी बाजारात आणली जाणार आहे.

या नोटेचे खास वैशिष्ट म्हणजे ती खूप सांभाळून वापरायची गरज राहणार नाही. भारतीय नागरिकांना खिशातील नोटा बाहेर न काढता कपडे धुण्याची खोड आहे. त्यामुळे अनेकदा नोटा भिजून खराब होतात. या नोटेच्या बाबतीत ती भीती राहणार नाही. कारण तिच्यावर दिल्या जाणार असलेल्या वार्निश पेंट मुळे ती सहज फाटणार नाही तशीच पाण्यात सहज भिजणार नाही. वार्निशचा उपयोग लाकूड, लोखंड अधिक काळ टिकावे आणि अधिक मजबूत व्हावे म्हणून केला जातो.

वार्निशचा वापर केल्याने नोटेच्या आयुष्य सध्याच्या नोटांपेक्षा दुप्पट होणार आहे. सध्याची १०० ची नोट साधारण साडेतीन वर्षात जुनी होते नवी नोट ७ वर्षे चांगल्या स्थितीत राहू शकणार आहे. सध्याचा १०० च्या १ हजार नोटा छापण्यासाठी १५७० रु. खर्च येतो त्यात नव्या नोतेमुळे २० टक्के वाढ होणार आहे. मात्र या नोटांवर रसायन, पाणी याचा परिणाम होणार नसल्याने त्या खराब होण्याचे प्रमाण १७० टक्क्यांनी कमी होणार आहे. या नोटा सहज दुमडता येणार नाहीत.

Leave a Comment