आजमावून पहा व्हिक्स व्हेपोरबचे असे ही उपयोग

vicks
सर्दी-पडसे उद्भविले, की हटकून आठवण होते व्हिक्स व्हेपोरबची. व्हिक्स व्हेपोरब हे प्रत्येक घरामध्ये आवर्जून आढळणारे, सर्दी वर अक्सीर इलाज असणारे, रामबाण बाम म्हणता येईल. पण व्हिक्स व्हेपोरबचा उपयोग केवळ सर्दीपुरताच मर्यादित नाही. त्या व्यतिरिक्त देखील व्हिक्सचा वापर अनेक प्रकारे करता येऊ शकतो. सर्दी झाल्यावर नाकाला आणि घशाला व्हिक्स लावण्यासोबतच थोड्या गरम पाण्यामध्ये अर्धा चमचा व्हिक्स व्हेपोरब मिसळून त्याने वाफ घेतल्याने देखील सर्दी-पडशामध्ये आराम मिळतो.
vicks1
ज्यांना मायग्रेनचा त्रास सतावत असेल, त्यांनी कपाळावर व्हिक्स लावून हलक्या हाताने मसाज केल्यास मायग्रेनमुळे उद्भविलेली डोकदुखी कमी होण्यास मदत होते. त्याचप्रमाणे एखादी हालचाल करताना धक्क्याने स्नायू दुखावल्यासही व्हिक्स व्हेपोरबने केलेली मालिश आरामदायक ठरते. दुखणाऱ्या स्नायूला व्हिक्सने मालिश करून त्या ठिकाणी मऊ कपडा गुंडाळून ठेवावा. त्यामुळे स्नायूला उष्णता मिळून स्नायूचे दुखणे कमी होण्यास मदत होते.
vicks2
पायांमध्ये सतत बूट घातल्याने पावलांना, बोटांना आणि नखांना हवा मिळत नाही. त्यामुळे अनकेदा पायाच्या बोटांच्या नखांवर बुरशी येऊ लागते आणि त्यामुळे पायाच्या बोटांची नखे काळसर पडू लागतात. ही बुरशी क्वचित वेदनादायी ठरू शकते, आणि मुख्य म्हणजे ती इतर नखांवरही फैलावू लागते. ही बुरशी फैलावण्यापासून रोखण्यासाठी आणि तीच समूळ नायनाट करण्यासाठी दिवसातून दोन ते तीन वेळा नखांना व्हिक्स व्हेपोरब लावावे. साधारण दोन आठवड्यांच्या अवधीमध्ये नखावर आलेला काळसरपणा नाहीसा होऊ लागेल.
vicks3
थंडीच्या दिवसांमध्ये आणि अनेकदा उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये देखील कोरड्या हवेमुळे पायांना भेगा पडू लागतात. जर यावर वेळीच उपाययोजना केली गेली नाही, तर या भेगा खोल होऊन अतिशय वेदना होऊ लागतात. क्वचित त्यातून रक्तस्राव देखील सुरु होतो. अश्यावेळी पायांच्या भेगा भरून येण्यासाठी दररोज रात्री झोपण्यापूर्वी टाचांना व्हिक्स व्हेपोरब लावावे, आणि त्यानंतर पायांवर मोजे चढवावेत. काहीच दिवसांमध्ये भेगा नाहीशा होऊन पाउले मुलायम झाल्याचे दिसून येईल.
vicks4
अनकेदा डास चावल्याने किंवा एखादा किडा चावल्याने अंगाला खाज सुरून बारीक पुरळ येते. या पुरळावर थोडेसे व्हिक्स व्हेपोरब लावल्यास खाज कमी होऊन पुरळ नाहीसे होण्यासही मदत होते. तसेच थोडेसे व्हिक्स कपड्यांवर लावले असता डास जवळपास येत नाहीत. लहान मुलांना डासांपासून वाचविण्यासाठी हा सोपा आणि निर्धोक पर्याय अवलंबून पहावा.