बाहुलीसारखे दिसण्यासाठी ट्रान्सजेन्डर महिलीने करविल्या वीस शस्त्रक्रिया !

tranny
आपण आकर्षक, सुंदर दिसावे, असे प्रत्येकालाच वाटत असते. त्यासाठी जो तो आपापल्या परीने प्रयत्नशील असतो. पण काही व्यक्ती मात्र आकर्षक दिसण्यासाठी हर तऱ्हेचे प्रयत्न करण्यास तयार असतात. अतिशय महागड्या सौंदर्य प्रसाधनांच्या वापरापासून, ते अगणित ब्युटी थेरपीज, आणि अगदी कॉस्मेटिक सर्जरीचे पर्याय ही अवलंबण्यास या व्यक्ती अजिबात मागेपुढे पहात नाहीत. ही कहाणी आहे अश्याच एक ट्रान्सजेन्डर महिलेची, जिने आपले रूप अगदी एखाद्या बाहुलीसारखे भासावे या साठी तब्बल वीस शस्त्रक्रिया करवून घेतल्या आहेत.
tranny1
जर्मनीतील बर्लिन शहरामध्ये राहणारी वाली इव्हाना २६ वर्षांची आहे. इवाना जन्मतः मुलगा असून, तारुण्यात पदार्पण केल्यानंतर इवानाने आपल्या शरीराचे रूपांतर महिलेच्या शरीरामध्ये करण्यासाठी शस्त्रक्रियेचा पर्याय निवडला. रूपांतर झाल्यानंतर अर्थातच इवानाची वेशभूषा देखील त्यानुसार पालटली. स्वतःला संपूर्णपणे बदलण्याचे इवानाचे वेड पाहता पाहता इतके वाढत गेले, ही त्या पायी इवानाने एका पाठोपाठ एक अश्या अनेक शस्त्रक्रिया करवून घेण्याचा चंगच बांधला. आजवर इवानाने वीस कॉस्मेटिक सर्जरी करविल्या असून, अगदी नाकापासून ते जबड्यापर्यंत सर्व अवयवांना आकार देणाऱ्या शस्त्रक्रिया यामध्ये समाविष्ट आहेत.
tranny2
‘मिरर’ दैनिकामध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार आजवर या शस्त्रक्रियांच्या साठी इवानाने ८७ हजार पाउंड, म्हणजेच तब्बल ८१ लाख रुपये खर्च केले आहेत. एखादी लहानशी कॉस्मेटिक सर्जरी करविण्यासाठी देखील भरभक्कम रक्कम मोजावी लागते, त्यामुळे वीस शस्त्रक्रियांसाठी इवानाने किती रक्कम मोजली असावी याची कल्पना आपण सहज करू शकतो. त्या शिवाय प्रत्येक शस्त्रक्रियेमुळे शरीराच्या आरोग्यासाठी देखील काही धोके उत्पन्न होताच असतात. तरीही इवाना या शस्त्रक्रिया करवून घेण्यास राजी असल्याचे समजते.
tranny3
सुरुवातीला आपला चेहरामोहरा अतिशय सर्वसामान्य असून, लोक आपल्याकडे दुर्लक्ष करीत आहेत असे जाणविल्यानंतर इवानाने कॉस्मेटिक सर्जरीचा पर्याय निवडल्याचे ती म्हणते. त्यानंतर इतक्या शास्त्रक्रियांच्या परिणामस्वरूप आपले रूप संपूर्णपणे पालटून टाकल्यानंतर आता लोकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत असल्याचे समाधान इवानाला आहे. अनेक जण तिला ‘प्लास्टिक डॉल’ म्हणून ही संबोधतात, पण त्यावर इवानाला हरकत नाही. बाहुलीसारखे दिसणे यातच तिला समाधान असल्याचे ती म्हणते.