मिठाई बनविण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या पदार्थांमधील भेसळ अशी ओळखावी

sweet
सणासुदीच्या दिवसांमध्ये कपडे, दागिन्यांच्या दुकानांसोबतच वाढती गर्दी दिसून येते ती म्हणजे मिठाईच्या दुकानांमधून. पण अनेकदा या मिठाया तयार करताना वापरण्यात येणाऱ्या पदार्थांमध्ये भेसळ असल्याची शक्यता असल्याने अश्या प्रकारच्या मिठायांचे सेवन आरोग्याच्या दृष्टीने धोकादायक ठरू शकते. आजकाल भेसळयुक्त मिठाईचे सेवन केल्याने अनेकांच्या जीवावर बेतले असल्याच्या बातम्या अनेकदा आपल्या पाहण्यात येत असतात. त्यामुळे मिठाई खरेदी करताना त्यामध्ये भेसळ नसल्याची खात्री करुन घेणे आवश्यक ठरते. मिठाई मध्ये वापरण्यात येणाऱ्या अनेक पदार्थांमध्ये भेसळ आहे किंवा नाही हे तपासण्यासाठी काही सोप्या पद्धतींचा अवलंब करता येऊ शकेल.
sweet1
दुधामधील भेसळ ही सर्वात मोठ्या प्रमाणात आढळणारी भेसळ आहे. अगदी पॅकेटबंद दुध देखील भेसळयुक्त असू शकते. दुधामध्ये पाणी मिसळले जाणे ही सर्वात सामान्य भेसळ म्हणता येईल. मात्र दुधामध्ये खडू, युरिया, साबण, किंवा अन्य रसायनांची भेसळ आरोग्याच्या दृष्टीने अपायकारक ठरू शकते. ही भेसळ ओळखण्यासाठी काही उपायांचा अवलंब करता येईल. थोडे दुध एका बाटलीमध्ये भरून घेऊन ही बाटली जोराने हालविली असता, यामध्ये अवाजवी प्रमाणामध्ये फेस आढळून येतो. असे झाल्यास दुधामध्ये साबण असण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच दुधामध्ये युरिया आहे किंवा नाही हे तपासून पाहण्यासाठी थोड्या दुधामध्ये तुरीच्या डाळीची पावडर मिसळून पहावी. त्यानंतर यामध्ये लिटमस पेपर बुडवावा. जर लिटमस पेपरचा रंग बदलून निळा झाला, तर दुधामध्ये भेसळ असल्याचे समजावे, आणि दुध वापरू नये.
sweet2
बाजारातून साजूक तूप विकत घेताना खबरदारी घेणे आवश्यक आहे. या तूपामध्ये भेसळ आहे किंवा नाही हे तपासून पाहण्यासाठी हायड्रोक्लोरिक अॅसिडची आवश्यकता असते. या रसायनाचे काही थेंब आणि थोडीशी साखर तुपामध्ये मिसळली असता तुपाचा रंग तांबूस झाला तर तुपामध्ये भेसळ असल्याचे समजावे. बाजारामध्ये उपलब्ध असणाऱ्या तयार खव्यामधील भेसळ तपासण्यासाठी मेडिकल स्टोअर्समध्ये खास अडल्टरेशन किट उपलब्ध असतात, त्यांचा वापर करता येईल. पण ही किट उपलब्ध नसल्यास, खव्यामध्ये स्टार्चची भेसळ तपासून पाहण्यासाठी आयोडीनचा वापर करता येतो. थोडा खवा पाण्यामध्ये उकळून घेऊन त्यामध्ये आयोडीनचे काही थेंब टाकल्याने या मिश्रणाचा रंग जांभळा दिसून येतो. जर खवा शुध्द असेल, तर थोडा खवा हातांच्या बोटांमध्ये चोळून पाहिल्यास तो काहीसा तेलकट लागतो, आणि त्याची गोडसर चव असते. असे असल्यास खवा शुद्ध असल्याचे समजावे.

अनेक मिठायांवर चांदीचा वर्ख लावण्यात येतो. या वर्खामध्ये देखील भेसळ असते. अनेकदा चांदीच्या वर्खाच्या ऐवजी पातळ अल्युमिनियम फॉईल वर्ख म्हणून वापरण्यात येते. ही भेसळ तपासून पाहण्यासाठी मिठाईवरील वर्ख हातांच्या बोटांमध्ये चोळून पाहावा. हा वर्ख एकत्र येऊन त्याचा गोळा झाल्यास हा चांदीचा वर्ख नसून अल्युमिनियम फॉईल आहे असे समजावे. चांदीचा वर्ख हातांच्या बोटांमध्ये चोळल्यास त्वरित तुटतो.

Leave a Comment