विवेकानंदांचे रॉक मेमोरिअल, कन्याकुमारी

viveka
भारत साधू संतांची भूमी म्हणून जगात परिचित आहे. या देशातील महर्षिना मानणारे भक्त फक्त भारतातच नाही तर परदेशातही मोठ्या संख्येने आहेत. स्वामी विवेकानंद यांनी भारतीय अध्यात्म, धर्म, दर्शन संपूर्ण जगाला समजावून देण्यात मोठे योगदान दिले आहे. भारताचे दक्षिण टोक कन्याकुमारी येथे विवेकानंदांचे भव्य स्मारक रॉक मेमोरिअल जगभरातील पर्यटकांचे आकर्षण केंद्र असून दरवर्षी येथे सरासरी २० ते २५ लाख पर्यटक भेट देतात.

rock
समुद्रात ज्या खडकावर हे स्मारक उभारले गेले आहे त्याची काही खास वैशिष्टे आहेत. १८९२ साली विवेकानंद कन्याकुमारीच्या समुद्रात असलेल्या या खडकावर पोहून गेले होते आणि त्यांनी तेथेच ध्यानधारणा केली. रात्रभर ते याच खडकावर समाधी अवस्थेत होते आणि येथेच त्यांना त्यांच्या जीवनातले ध्येय गवसले. त्यानंतर त्यांनी १८९३ मध्ये अमेरिकेच्या शिकागो धर्म परिषदेत केलेले भाषण अजरामर ठरले. विवेकानंदाना आत्मज्ञान प्राप्त झालेल्या या खडकावर १९७० साली भव्य स्मारक उभारले गेले तेच हे रॉक मेमोरिअल.

लाल रंगाच्या दगडात हे स्मृती भवन बांधले गेले असून येथे साडेआठ फुट उंचीची विवेकानंद यांची भव्य मूर्ती, ध्यान केंद्र आहे. चारीबाजूनी समुद्राने वेढलेल्या या स्मारकात मंदिर, चर्च आणि मशीद यांचा सुरेख संगम आहे. येथून सूर्योदय आणि सूर्यास्त दोन्ही अनुभवता येतात. येथे अरबी, हिंद आणि बंगाल खाडी असा तीन समुद्राचा संगम असल्याने या ठिकाणाचे महत्व अधिक आहे.

Leave a Comment