सिंधुदुर्गातील या गावात गेल्या दीडशे-दोनशे वर्षांपासून होत नाही चहाची विक्री !

sindhudurg
सिंधुदुर्ग – आपले चहा हे राष्ट्रीय पेय असल्याचे म्हटले तर वावगे ठरणार नसल्यामुळे एखादी तरी चहाची टपरी कोणत्याही गावात गेल्यास हमखास पाहायला मिळते. पण याला वेंगुर्ले तालुक्यातील मातोंड गाव अपवाद ठरले आहे. या गावात चहाची विक्रीच होत नाही. याचे कारणही आदर्शवत असेच आहे. पूर्वजांकडून गावातील तंटामुक्तीसाठी गावात चहा विक्री बंद करण्यात आली. विशेष म्हणजे दीडशे दोनशे वर्षांपूर्वीच हे गाव तंटामुक्त झाले आहे. सोबतच गावात गेल्या अनेक दशकांपासून दारूबंदीची चोख अंमलबजावणी केली आहे आणि हा सामाजिक बदल मातोंड ग्रामस्थ एका प्रथा म्हणून पाळत आहेत.

२५०० पेक्षा जास्त लोकसंख्या असलेले वेंगुर्ले तालुक्यातील मातोंड हे एक टुमदार आणि आदर्श गाव आहे. चहाची विक्रीच या गावात केली जात नसल्याने चहाची एकही टपरी येथे आढळत नाही. याचे कारण देखील अनोखे आहे. दीडशे-दोनशे वर्षांपूर्वी मातोंड गावात एक चहाची टपरी होती. हे टपरीचे ठिकाण गावचा चव्हाटा बनल्यामुळे या ठिकाणी गावातील सर्व नागरिक गप्पा गोष्टी करण्यासाठी एकत्र येत असे. असेच एक दिवस गप्पा गोष्टी करताना या चहाच्या टपरीवर २ गटात मोठा वाद झाला. हा वाद मिटवण्यासाठी त्यावेळच्या गाव पंचायतीकडे आला.

सातेरी देवीच्या मंदिरात मातोंड गावकीची बैठक गावातील होत असे. गावात त्यावेळी यापुढे वाद होऊ नये म्हणून चहाची विक्रीच बंद करण्याचा निर्णय गावातील प्रतिष्ठित व्यक्तींकडून घेण्यात आला. तेव्हापासून म्हणजेच दीडशे दोनशे वर्षांपूर्वी पासून या गावात तंटामुक्तीसाठी चहाविक्री बंद केली गेली. त्याचप्रमाणे गावात दारू देखील तंट्याना कारणीभूत ठरत होती. त्यामुळे चहाविक्री बंदी सोबतच गावात दारूबंदी देखील करण्यात आली. मातोंड गावातील ग्रामस्थांची ग्रामदैवत असलेल्या सातेरी देवीवर अपार श्रद्धा आहे. त्यामुळे सातेरी मंदिरात झालेला हा निर्णय ग्रामस्थ गेली अनेक दशकांपासून प्रथा म्हणून पाळत आहेत.

समाज सुधारणेसाठी राज्य शासनाकडून १० वर्षांपासून तंटामुक्ती अभियान राबवले जात आहे. तर काही गावे आणि चंद्रपूर सारख्या जिल्ह्यांमध्ये लोक आग्रहास्तव काही वर्षांपासून दारू बंदी लागू केली. पण वेंगुर्लेतील मातोंड गावात गेली पंधरा ते वीस दशकांपासून तंटामुक्ती आहे. तसेच या गावात अनेक पिढ्यांपासून दारूबंदी लागू असल्यामुळे तंटामुक्तीसाठी चहाविक्री न करणाऱ्या मातोंड गाव इतर गावांसाठी एक आदर्श गाव ठरले आहे.

Leave a Comment