मुंबईच्या पिंगला मोरेने साकारले होते बालदिनाचे डूडल!

pingla-more
बालदिनाचे औचित्य साधत बुधवारी मुंबईच्या पिंगला राहुल मोरे या विद्यार्थिनीने चितारलेल्या चित्राची गुगलने डूडल म्हणून निवड केली. पाच लाख रुपयांची शिष्यवृत्ती तिला गुगलकडून मिळणार आहे.

‘डूडल फॉर गुगल’ ही स्पर्धा गुगलच्या भारतीय आवृत्तीने बालदिनानिमित्त घेतली. ‘माझे प्रेरणास्थान’ हा विषय त्यात दिला होता. पिंगलाने या चित्रात अवकाशाचा दुर्बिणीतून वेध घेणारी मुलगी रेखाटली आहे. त्याचबरोबर तर या अवकाशात आकाशगंगा, ग्रह आणि अवकाशयानांची अशी रचना केली आहे की ज्यातून ‘गुगल’ ही अक्षरेही दृश्यमान व्हावीत!

गुगलकडे या स्पर्धेसाठी हजारो चित्रे आली. विशेष म्हणजे सहभागी मुलांपैकी ५५ टक्के मुले ही महानगरांपलीकडची होती. तज्ज्ञांमार्फत आलेल्या चित्रांपैकी काही चांगल्या चित्रांची निवड करण्यात आली. या चित्रांचे त्यानंतर पहिली ते दुसरी, तिसरी ते चौथी, पाचवी ते सहावी, सातवी ते आठवी आणि नववी ते दहावी; असे इयत्तांनुसार पाच गट करण्यात आले. चित्रांची या वयोगटांनुसार पुन्हा छाननी आणि निवड झाली आणि अखेर अंतिम निवडीसाठी ही चित्रे ऑनलाइन झळकवण्यात आली. त्यात पिंगला हिच्या चित्राला सर्वाधिक म्हणजे तीन लाख मते पडली आणि ती विजेती ठरली. मुंबईच्या जे. बी. वाच्छा हायस्कूलमध्ये आठवीच्या वर्गात पिंगला ही शिकत आहे. अंतराळ संशोधन हा तिच्यासाठी कुतूहलाचा विषय आहे.

Leave a Comment