सूर्यदेवतेच्या आराधनेस समर्पित ‘छठ पूजा’

chhath
दर वर्षी गंगा नदी आणि गंगेच्या उपनदींच्या तीरांवर ‘छठ पूजे’च्या निमित्ताने लाखो भाविक एकत्र येत असतात. उत्तर भारतामध्ये, विशेषतः बिहार राज्यामध्ये हा उत्सव प्रामुख्याने साजरा केला जातो. दर वर्षी कार्तिक महिन्याच्या सुरुवातीच्या सहाव्या दिवशी, म्हणजेच षष्ठीच्या दिवशी हा उत्सव साजरा केला जात असतो. हा उत्सव सूर्यदेवतेला समर्पित असून, सूर्याबरोबरच त्याची अर्धांगिनी असलेली ‘उषा’ हिची आराधना ही या उत्सवामध्ये केली जाते. चार दिवस चालणाऱ्या या उत्सवाच्या प्रत्येक दिवशी निरनिराळे धार्मिक विधी केले जातात.
chhath1
उत्सवाच्या पहिल्या दिवसाची सुरुवात सूर्योदयाच्या वेळी नदीमध्ये स्नान करण्याने होते. या दिवशी गंगा स्नानाचे विशेष महत्व आहे. गंगा किंवा कोसी, कर्नाली या उपनदींमध्ये स्नान केल्यानंतर या नदींचे जल कलशामध्ये भरून घेऊन, ते घरी नेऊन त्याचे पूजन करण्याचा प्रघात आहे. उत्सवाच्या दुसऱ्या दिवशी भाविक सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत उपवास करतात. सूर्यास्त होत असताना सूर्याची पूजा करून, खीर पोळी आणि फळांचा नैवेद्य अर्पण करून, हाच प्रसाद ग्रहण करून उपवासाची सांगता केली जाते. तिसऱ्या दिवशी सुरु होणाऱ्या उपवासापूर्वीचे हे शेवटचे अन्नसेवन असते. त्यानंतर पुन्हा उपवास सुरु होतो.
chhath2
उत्सवाच्या तिसऱ्या दिवशी देखील संपूर्ण दिवस भाविक उपवास करतात. हा उपवास छत्तीस तास इतक्या अवधीचा असतो. या दिवशी सूर्योदयाच्या वेळी सूर्याची पूजा केली जाते, व सायंकाळी सूर्यास्ताच्या वेळी सूर्याची उपासना करून ‘थेकुआ’ नामक गव्हाच्या पीठाने बनविलेला पदार्थ सूर्यदेवाला प्रसाद म्हणून अर्पण केला जातो. उत्सवाच्या चौथ्या दिवशी सूर्योदयाच्या वेळी सूर्यदेवाची पूजा केल्यानंतर भाविक उपवासाची सांगता करतात. अश्या प्रकारे चार दिवस चालणाऱ्या या उत्सवाची सांगता होते.
chhath3
या उत्सवाचा इतिहास फार प्राचीन आहे. ही व्रतपरंपरा सहाव्या शतकापासून भारतामध्ये अस्तित्वात असल्याचे उल्लेख सापडतात. प्राचीन काळी हिंदू धर्मामध्ये अग्नी, वायू, इंद्र आणि सूर्य या देवतांचे प्रामुख्याने पूजन केले जात असल्याचे उल्लेख ऋग्वेदामध्ये आढळतात. अंधाराचा नाश करून सृष्टी प्रकाशमान करणाऱ्या सूर्याच्या पूजनाचे महत्व आजच्या काळामध्ये ही मोठे आहे. ज्याच्या जपाने अलौकिक उर्जा शरीरामध्ये निर्माण होते असा गायत्री मंत्र, ‘सवितृ’, म्हणजेच सूर्याला समर्पित आहे. ऋग्वेदामध्ये सूर्याप्रमाणेच ‘उषा’ (पहाट) आणि तिची भगिनी ‘रात्री’ यांच्या आराधनेलाही महत्व दिलेले आहे. सृष्टीतील अंधःकार नाहीसा करून सूर्याच्या किरणांनी सृष्टी प्रकाशमान करणारी आणि नकारात्मक शक्तींचा नायनाट करणारी उषा, म्हणून तिची आराधना महत्वाची मानली गेली आहे. केवळ हिंदू परंपरेमधेच माही, तर उषेचा उल्लेख रोमन परंपरेमध्येही केला गेला आहे. या परंपरेमध्ये उषेचा उल्लेख ‘ऑरोरा’ या नावाने केला गेला आहे.

सूर्यदेवाची आराधना भारतामध्ये मौर्य वंशाच्या काळापासून चालत आली असल्याचे उल्लेख इतिहासामध्ये आहेत. पाचव्या शतकामध्ये सूर्याराधना उत्तर भारतामध्ये बहुतेक ठिकाणी रूढ झाली होती. याच काळामध्ये सूर्यदेवाला समर्पित अनेक भव्य मंदिरांचे निर्माण केले गेले. सूर्याची अर्धांगिनी उषेला समर्पित मंदिरे, राजस्थानमधील भरतपूर येथे आणि हिमाचल प्रदेशातील किन्नौर येथे पहावयास मिळतात.

Leave a Comment