मराठा आरक्षणाचा १ डिसेंबरला जल्लोषच करा – मुख्यमंत्री

devendra-fadanvis
अहमदनगर – सरकारला मागासवर्गीय आयोगाचा अहवाल प्राप्त झाला असून कायदेशीर प्रक्रिया पार पाडून आता मराठा समाजाला आरक्षण दिले जाणार असल्यामुळे श्रेयवादावर न अडकता १ डिसेंबरला जल्लोष करा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज शनी शिंगणापूर येथे केले आहे.

उर्वरीत कार्यवाही देखील येत्या काही दिवसातच करण्यात येईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्याबद्दल बोलताना आश्वासक पवित्रा घेतला आहे. आंदोलन काय करता, सरकार निर्णय घेणारचे आहे, आंदोलनापेक्षा १ डिसेंबरला जल्लोषच करा, असे मुख्यमंत्री म्हणाले आहेत. आज शनी शिंगणापूर येथे अखिल भारतीय मराठा महासंघ प्रणित शेतकरी मराठा महासंघाच्या वतीने शेतकरी-वारकरी महासंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थिती संपन्न झालेल्या या महासंमेलनास राज्यभरातून शेतकरी आणि वारकरी एकत्र उपस्थित होते.

मुख्यमंत्र्यांनी यावेळी उपस्थित शेतकरी-वारकरी संमेलनात बोलताना मागासवर्गीय आयोगाचा अहवाल सरकारला प्राप्त झाल्याबद्दल समाधान व्यक्त केले. मराठा समाजाच्या मागणीला पाठबळ देत आरक्षणाचा मार्ग मोकळा झाल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. कायदेशीर प्रक्रिया येत्या दहा-पंधरा दिवसात पूर्ण करून मराठा समाजाला आरक्षण घोषित होईल. आता यात कोणी श्रेयवाद घेण्यासाठी वाद निर्माण करू नये, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले आहे. आंदोलनाची भाषा करणाऱ्यांना १ डिसेंबर रोजी जल्लोष करण्याचे आवाहन करत त्यांनी आंदोलनकर्त्यांना टोला लगावला.

मुद्दा बऱ्याच काळापासून मराठा आरक्षणाचा गाजत आहे. मोठ्या प्रमाणात मराठा आरक्षणासाठी ठिकठिकाणी आंदोलने झाली. राज्यसरकार यावर काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मागासवर्गीय प्रवर्गातील मराठा आरक्षणाचा अहवाल सरकारला प्राप्त झाला आहे. याबाबत सरकार लवकरच ऐतिहासिक निर्णय घेणार, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Leave a Comment