पंचवीस कोटी रुपयांपर्यंत लागली ‘शहनशाह’ रेड्यांची बोली

bull
पानिपत – पंचवीस कोटी रुपयांपर्यंतची बोली हरियाणातील डिडवाडी गावातील पशू पालक नरेंद्र सिंह यांच्याकडे असलेल्या मुऱ्हा जातीच्या रेड्याला खरेदी करण्यासाठी लागली आहे. पण शहनशाह नावाच्या या रेड्याला विकण्यास नरेंद्र सिंह मुळीच तयार नाहीत. याचे कारण असे आहे की, भारतासह कोलंबिया, व्हेनेझुएला, कोस्टारिका आदी अनेक देशांमध्ये या रेड्याच्या वीर्याला मागणी आहे.

४ वर्षांच्या या रेड्याची लांबी १५ फूट, उंची ६ फूट असून मुऱ्हा जातीच्या चॅम्पियनशिपमध्ये झोटा गटात त्याने पहिला क्रमांक पटकाविला आहे. अनेकांना त्याचे राहणीमान ऐकूण आश्चर्य वाटेल. रोज शॅम्पूने या रेड्याला अंघोळ घातली जाते. यानंतर अर्धा लिटर मोहरीच्या तेलाने मालीश केली जाते. तसेच, प्रत्येक आठवड्याला त्याच्या अंगावरचे केस कापले जातात. खास स्विमिंग पूलही त्याच्यासाठी बनवण्यात आला आहे. त्याला राहण्यासाठी जमिनीवर मॅट पसरविले आहे. तो यावरच बसतो आणि झोपतो.

या रेड्याचे खाणेही पंचतारांकित म्हणावे असेच आहे. रोज १० लिटर दूध, १० किलो सफरचंदे, २०० ग्रॅम मिलन मिक्सर यांचा त्याच्या आहारात समावेश आहे. याबाबत मालक नरेंद्र सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार दर महिन्याला साधारण ४८ हजार रुपये त्याच्यावर खर्च केले जातात. घोलू नावाचा त्यांच्याकडे एक रेडा होता. या रेड्याने अनेक स्पर्धा जिंकल्या होत्या. शहनशाह या घोलूचेच अपत्य आहे. आता शहनशाहने केवळ आजूबाजूच्या भागातच नव्हे, तर देशात आणि परदेशातही आपली ओळख निर्माण करत आहे. त्याचे मालक नरेंद्र सिंग त्याच्या वीर्याच्या विक्रीतून कोट्यवधी रुपये कमवत आहेत. तसेच, विविध स्पर्धांमध्ये या रेड्याच्या प्रदर्शनातून त्यांचा मान-सन्मानही वाढत आहे.

Leave a Comment