पाणी बचतीसाठी ही महिला सीइओ १०० दिवसात धावणार १०० मॅरेथॉन

meena
जिद्द असेल आणि समाजासाठी काही करण्याची जबरदस्त इच्छा असेल तर संकटाचे पहाड सहज पार करता येतात हे दाखवून दिले आहे हाँगकाँग बेस थ्रस्ट या कंपनीत सीइओ पदावर कार्यरत असलेल्या ४८ वर्षीय मीना गुणी या महिलेने. गेली चार वर्षे जगभरातील स्पोर्ट्स कम्युनिटीमध्ये मॅरेथॉन वूमन अशी तिची ओळख आहे. या वर्षी तिने १०० दिवसात १०० मॅरेथॉन करण्याची मिशन हाती घेतले असून या काळात ती २० देशातून धावणार आहे. या मिशनची तिची पहिली मॅरेथॉन न्युयॉर्कमध्ये ४ नोव्हेंबरला झाली असून शेवट ११ फेब्रुवारीला न्युयोर्क येथेच १०० वी मॅरेथॉन धावून होणार आहे.

मीना हे सारे करते आहे ते पाणी बचाव योजनेसाठी. जगभरातील लोकांच्यात पाणी बचतीसंदर्भात जागृती करण्यासाठी ती धावते आहे. विशेष म्हणजे शाळा कॉलेज मध्ये असताना तिने कधीच कोणत्याच खेळत सहभाग घेतला नव्हता. मात्र नोकरीत असताना २० वर्षापूर्वी तिला कार अपघात झाला पाठीला जबरदस्त मार लागल्याने खेळणे सोडाच पण नेहमीचे चालणे फिरणे तिला शक्य नाही असे निदान केले गेले.

अपघातातून थोडी बरी झाल्यावर तिने स्विमिंग सुरु केले आणि हळू हळू धावयला तिने सुरवात केली. चीन मध्ये झालेल्या एका पाणी समस्येवरील परिषदेत तिच्यावर पाणी बचत योजनेचा प्रभाव पडला आणि तिने पाणी बचत जागृती हेच तिचे ध्येय मानून कामाला सुरवात केली. यासाठी तिने आधार घेतला मॅरेथॉन धावण्याचा. गेल्या वर्षी ४० दिवसात ४० मॅरेथॉन तिने याच मोहिमेसाठी पूर्ण केल्या आणि जगात तिची दखल घेतली गेली. यंदाच्या मोहिमेत ती ४२०० किमी अंतर धावणार असून या काळात ती भारतात येणार आहे. मात्र भारतात ती कोणत्या तारखेला असेल हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.