‘अवनी’चा पुळका आलेल्या वन्यप्रेमींनी गावात राहुन दाखवावे

avnee
यवतमाळ : देशभरातील वन्यप्रेमींकडून १३ शेतकरी-शेतमजुरांची शिकार करणाऱ्या अवनी वाघिणीला ठार केल्याने ओरड सुरू असल्यामुळे येथील गावकरी संतप्त झाले आहेत. इतकाच जर अवनी वाघिणीचा पुळका आहे तर त्यांनी वाघाची दहशत असलेल्या गावांमध्ये परिवारासह केवळ तीन दिवस मुक्कामी राहुन दाखवावे, असे खुले आव्हान संतप्त गावकऱ्यांनी वन्यप्रेमींना केले आहे.

सुमारे वर्षभर हुलकावणी दिल्यानंतर वन पथकाचा निशाणा बनलेल्या नरभक्षक वाघीणीबद्दल माध्यमांवर तिचे पाठीराखे वन खात्याविरोधात गरळ ओकताना दिसत आहेत. त्यांचा वाघीनीला मारायला नको होते, असा सूर आहे. पण त्यांची ही ओरड ऐकून गावकऱ्यांचा संताप अनावर झाला आहे. एकापाठोपाठ १३ जणांची अवनी वाघिणीने शिकार केली तेव्हा हे वन्यजीवप्रेमी नेमके कुठे होते, असा सवाल गावकऱ्यांनी केला आहे.

अवनी वाघिणीची मुंबई-पुण्यात वातानुकूलित कक्षात बसून पाठराखण करणे सोपे आहे. वाघाची दहशत असलेल्या पांढरकवडा, राळेगाव, कळंब तालुक्यातील कोणत्याही गावात या पाठीराख्यांनी परिवारासह तीन दिवस मुक्काम करून पाहावा आणि शेतशिवारात जाऊन दाखवावे. मग त्यांना वाघाची दहशत काय असते ते कळेल, असे या गावकऱ्यांनी म्हटले आहे.

Leave a Comment