ट्रम्पनी तोडली 15 वर्षांची परंपरा, व्हाईट हाऊसमध्ये यंदा दिवाळी नाही

donald-trump
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गेल्या 15 वर्षांपासून चालू असलेली परंपरा खंडीत केली आहे. अध्यक्षांचे अधिकृत सरकारी निवासस्थान असलेल्या व्हाईट हाऊसमध्ये यंदा दिवाळी साजरी होणार नाही.
यंदा दिवाळी आणि अमेरिकेतील मध्यावधी निवडणूक एकत्र आली आहे. त्यामुळे ट्रम्प हे निवडणुकीच्या प्रचारात मग्न असल्यामुळे ते हा सण साजरा करणार नाहीत, असे सांगण्यात येत आहे.

अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष जॉर्ज बुश यांनी 2003 साली दिवाळी साजरी करण्याची परंपरा सुरू केली होती. त्यानंतरचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी ती परंपरा चालू ठेवली होती. तसेच ट्रम्प यांनीही गेल्या वर्षी व्हाईट हाऊसमध्ये पारंपरिक दीप लावून दिवाळी साजरी केली होती.

मात्र ते यंदा निवडणुकीत गुंतलेले आहेत. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पोम्पियो यांनी बुधवारी दिवाळीच्या शुभेच्छा देतानाच भारतीय मूळ असलेल्या अमेरिकी नागरिकांच्या योगदानाची तारीफ केली. “लोक हा सण साजरा करण्यासाठी मिणमिणत्या दिव्यांच्या माळांनी आपली घरे सजवत आहेत. अशा वेळेस मी दिवाळीच्या निमित्ताने अमेरिकेतील आमच्या त्या मित्रांच्या कामगिरीचे कौतुक करू इच्छितो ज्यांनी आपल्या दैनंदिन कामातून आपल्या देशासाठी महत्त्वाचे योगदान दिले आहे,” असे त्यांनी म्हटले आहे.