दिल्लीतील प्रदूषणावर उपाय कृत्रिम पावसाचा?

pollution
दिल्लीत भयंकर स्वरूप धारणा करणाऱ्या प्रदूषणावर उपाय म्हणून कृत्रिम पाऊस पाडण्याचा विचार केंद्रीय प्रदूषण मंडळ (सीपीसीबी) करत आहे. दिवाळीनंतर राजधानी प्रदेशात उद्भवणारे धुके दूर करण्यासाठी अशा प्रकारे कृत्रिम पाऊस पाडण्यात येईल. तसेच दिल्लीच्या नागरिकांनी खासगी डिझेल मोटारींचा वापर टाळावा, असे आवाहनही सीपीसीबीने केले आहे.

दिवाळीनंतर राष्ट्रीय राजधानी प्रदेशात प्रदूषणाची पातळी अतितीव्र आणीबाणीपर्यंत जाण्याची शक्यता आहे. त्यावेळी कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी-कानपूर आणि भारतीय हवामान विभाग (आयएमडी) या दोन खात्यांच्या तज्ञांशी चर्चा सुरू आहे, असे सीपीसीबीच्या एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने पीटीआय वृत्तसंस्थेला सांगितले.

हवामानाची परिस्थिती स्थिर होण्याची आम्ही प्रतीक्षा करत आहोत, जेणेकरून कृत्रिम पावसासाठी क्लाऊड सीडिंगचा प्रयोग करता येईल, असे या अधिकाऱ्याने सांगितले. दिवाळीनंतर दोन दिवस दिल्लीत खासगी जड वाहनांना प्रवेश बंद करावा, असा सल्लाही सीपीसीबीने वाहतूक खात्याला दिला आहे.

दिल्लीत प्रदूषणामुळे फटाक्यांवर निर्बंध घातले असूनही प्रदूषण कमी झालेले नाही. डॉक्टरांनी नागरिकांना सकाळी व सायंकाळी फिरायला न जाण्याचा सल्ला दिला आहे. येत्या काही दिवसांत प्रदूषणाची पातळी आणखी वाढून लोकांचा त्रासही वाढेल, असे तज्ञांचे मत आहे.