दिवाळीनिमित्त हिंदू समुदायाला इम्रान खान, विरोधी नेत्यांच्या शुभेच्छा

imran-khan
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान आणि त्यांच्या सरकारमधील मंत्र्यांनी तसेच विविध विरोधी पक्षनेत्यांनी दिवाळीनिमित्त हिंदू समुदायाला शुभेच्छा दिल्या आहेत. “आमच्या सर्व हिंदू नागरिकांना दिवाळीच्या शुभेच्छा,” असे ट्वीट करून खान यांनी या शुभेच्छा दिल्या.

खान यांच्यासह परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरेशी, अर्थमंत्री असद उमर, माहिती मंत्री फवाद चौधरी आणि सिंधचे राज्यपाल इम्रान इस्माइल यांच्यासह खान सरकारमधील इतर अनेक महत्त्वाच्या सदस्यांनी हिंदू समाजाला शुभेच्छा दिल्या आहेत.

नॅशनल असेंब्लीमधील विरोधी पक्षनेते आणि पाकिस्तानी मुस्लिम लीग-नवाज गटाचे प्रमुख शेहबाज शरीफ यांनीही हिंदू समाजाला शुभेच्छा दिल्या आहेत. हिंदू समुदायाचे सदस्य हे पाकिस्तानचे समान नागरिक असल्याचे त्यांनी सांगितले.

नॅशनल असेंब्लीचे सभापती असद कैसर यांनीही हिंदू संसद सदस्यांना आणि हिंदू समाजालाही शुभेच्छा दिल्या. “पाकिस्तान हा बहुसंस्कृतीवादी देश आहे आणि सांस्कृतिक विविधतेने समृद्ध आहे,” असे त्यांनी म्हटले आहे.

पाकिस्तानातील गैर-मुस्लिमांचे हक्क राज्यघटनेतच नमूद केले असून त्यांना इस्लामने हमी दिली आहे. तसेच अल्पसंख्यांक समुदायाच्या सदस्यांनी पाकिस्तानची निर्मिती, संरक्षण, जडणघडण आणि विकास यांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली, असे शरीफ म्हणाले. पाकिस्तान पीपल्स पार्टीचे अध्यक्ष बिलावल भुट्टो जरदारी यांनी जगभरातील आणि पाकिस्तानमध्ये हिंदू समुदायांना शुभेच्छा दिल्या.

पाकिस्तानमध्ये अधिकृत अंदाजानुसार 75 लाख हिंदू राहतात. मात्र हिंदू समाजाच्या मते, 90 लाखांहून अधिक हिंदू देशात राहतात.