दिल्लीतील दिवाळीनंतरच्या वायू प्रदूषणामुळे शेजारील राज्यांनाही धोका

delhi
नवी दिल्ली – राजधानी दिल्लीत दिवाळी नंतर वायू प्रदूषणाने धोक्याची पातळी गाठली आहे. परिणामी प्रदूषीत धुक्याची चादर दिल्लीवर पसरलेली आहे. हवेतील प्रमुख प्रदूषक पीएम २.५ आणि पीएम १० हे ९०० पर्यंत पोहोचले आहेत. वायू गुणवत्ता आणि हवामान खात्याने हवेत कार्बन मोनॉक्साईडचे प्रमाण ८७ टक्के झाल्याची नोंद केली आहे.

दिल्लीमध्ये दिवाळीपूर्वी वायू शुद्ध करणारे मोठे यंत्र बसवले होते. पण त्यांनीही काम करणे बंद केले आहे. कार्बन मोनॉक्साईडचे प्रमाण वाढल्यामुळे नागरिकांना अनेक आजारांचा सामना करावा लागू शकतो. वायू प्रदूषणाचा दिवाळीनंतर त्रास केवळ दिल्लीकरांनाच नाही तर इतर राज्यातील लोकांनाही होण्याची शक्यता आहे.

दिवाळीमध्ये फटाके वाजवण्याची वेळ सर्वोच्च न्यायालयाने ठरवून दिली होती. परंतु, या निर्देशांची सर्वच राज्यात पायमल्ली झाल्याचे चित्र आहे. दिल्लीमध्ये हरित फटाकेच वाजवण्याचे निर्देश न्यायालयाने दिले होते. मात्र, बाजारात हे फटाके उपलब्ध नसल्यामुळे अनेकांना पारंपारिक फटाके वाजवावे लागले.