काँग्रेस-टीडीपीची युती म्हणजे ईस्ट इंडिया कंपनी – ओवैसी

Asaduddin-Owaisi
चंद्राबाबू नायडू यांच्या नेतृत्वाखालील तेलुगु देसम आणि काँग्रेसची युती म्हणजे ईस्ट इंडिया कंपनीचा अवतार आहे, अशी खरमरीत टीका ऑल इंडिया मजलिस-ए- इत्तेहाद-ए-मुसलमीन (एआयएमआयएम) पक्षाचे नेते असदुद्दीन ओवैसी यांनी केली आहे. त्याचसोबत त्यांनी भारतीय जनता पक्ष आणि अन्य पक्षांवरही निशाणा साधला आहे.

तेलंगाणा विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचारासंदर्भात ओवैसी यांनी हे वक्तव्य केले आहे. तेलंगाणाचे निर्णय आता आंध्र प्रदेशात बसलेले चंद्राबाबू नायडू करणार का? किंवा नागपुरमधील रा. स्व. संघ करणार अथवा दिल्लीतील काँग्रेस पक्ष करणार, असा सवाल ओवैसी यांनी केला. ईस्ट इंडिया कंपनीचे निर्णय ज्या प्रकारे ब्रिटनमध्ये होत होते तसेच तेलंगाणातील या महायुतीचे सर्व निर्णय तेलंगाणाच्या बाहेर होत आहेत, असे ओवैसी म्हणाले. राज्यात जर काँग्रेस-तेलुगु देसम युती मजबूत झाली तर राज्यातील नेत्यांवर परिणाम होईल, असा इशाराही त्यांनी दिला.

या वक्तव्याद्वारे त्यांनी राज्यातील सत्ताधारी तेलंगाणा राष्ट्र समिती पक्षाला बळ दिले असल्याचे निरीक्षकांचे मत आहे. तेलंगाणा विधानसभेच्या 119 जागांसाठी 7 डिसेंबर रोजी मतदान होणार असून 11 डिसेंबर रोजी निकाल जाहीर होणार आहेत.