केवायसीसाठी एअरटेलचा नवा डिजिटल पर्याय

airtel
डिजिटल केवायसीसाठी भारती एअरटेलने नवा विकल्प शोधला असून आता या नव्या केवायसी प्रकियेचा वापर एअरटेलचे सीम घेणारे ग्राहक करू शकणार आहेत. आधार कार्डवर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर टेलिकॉम कंपन्या आता केवायसीसाठी नवे विकल्प शोधत आहेत. आधार नवे कनेक्शन घेणाऱ्या ग्राहकांसाठी अनिवार्य नाही आणि टेलिकॉम कंपन्यांनी याचा विकल्प शोधायला हवा, असे आदेश न्यायालयाने दिले होते.

सध्या ही व्हेरिफिकेशन प्रकिया एअरटेलने दिल्ली-एनसीआर, युपी-ईस्ट आणि वेस्ट सर्कलच्या युजर्ससाठी सुरू केली आहे. ही सेवा हळूहळू अन्य सर्कलमध्ये सुरू करण्यात येणार आहे. भारती एअरटेलचे नवे कनेक्शन घेणाऱ्या ग्राहकांचे महत्त्वाचे दस्ताऐवज जसे की छायाचित्र, ओळखपत्र आणि अॅड्रेस प्रूफ स्कॅन करण्यात येणार आहेत. त्यासह युजर्सचे लाईव्ह फोटो क्लिक करुन त्यांना डिजीटली फिड करण्यात येणार आहे. अशाप्रकारे कंपनीची डिजिटल व्हेरिफिकेशन प्रोसेस पूर्ण करण्यात येणार आहे.

यावर बोलताना कंपनीने सांगितले, की टप्प्याटप्प्याने या डिजिटल प्रोसेसला लागू करण्यात येणार आहे. एअरटेलसह व्होडाफोन आयडिया पण सध्या वैकल्पिक केवायसी प्रकियेवर काम करत आहे. ग्राहकांना न्यायालयाच्या निर्देशानुसार नव्या सीम घेताना आधार कार्डची सक्ती नको. टेलिकॉम कंपन्यांनी याचा पर्याय शोधावा, असे न्यायालयाने स्पष्ट केले होते.