गुजरात सरकार बदलणार अहमदाबादचे नाव

vijay-rupani
अहमदाबाद – फैजाबाद जिल्ह्याचे उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ यांनी नामकरण अयोध्या असे केल्यानंतर आता अहमदाबादचे नाव बदलण्याची तयारी गुजरात सरकारनेही केली आहे. अहमदाबादचे नाव कर्णावती असे करण्याचा निर्णय गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी यांनी घेतल्याचे स्पष्ट केले आहे. गुजरातचे उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांनी गांधीनगर या ठिकाणी पत्रकारांशी बोलताना अहमदाबादचे नाव बदलणार असल्याचे पत्रकारांना सांगितले. यासाठीची कायदेशीर प्रक्रिया बाकी असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

कर्णावती असे अहमदाबादचे नाव करण्यात यावे अशी लोकभावना आहे. लोकांकडून जर या नावासाठी आम्हाला पाठिंबा मिळाला तर आम्ही कायदेशीर अडथळे पार करून अहमदाबादचे नाव नक्की बदलू असेही नितीन पटेल यांनी म्हटले आहे. ११ व्या शतकात अहमदाबादचे नाव अशावल असे होते. अनिल्वराचा चालुक्य राजा कर्ण याने अशावलच्या भिल्ल राजाविरोधात लढाई जिंकली ज्यानंतर त्याने अशावलचे नाव बदलून कर्णावती असे ठेवले. त्याच नावाची आठवण म्हणून अहमदाबादचे नावही कर्णावती असे ठेवणार असल्याचे नितीन पटेल यांनी म्हटले आहे. अहमद शाह या सुलतानाने कर्णावतीचे नाव बदलून अहमदाबाद असे ठेवले होते. पण हे नाव बदलण्याचा आम्ही विचार करतो आहोत असेही पटेल यांनी म्हटले आहे.

काँग्रेस प्रवक्ते मनिष दोशी यांनी नितीन पटेल यांच्या या वक्तव्यावर टीका केली आहे. मतांच्या राजकारण करायचे असल्याने भाजपाकडून शहरांची नावे बदलली जात आहेत. कर्णावती असे अहमदाबादचे नाव करण्यात काहीही अर्थ नाही असेही दोशी यांनी म्हटले आहे. भाजपकडून हिंदूंची दिशाभूल करण्याचे काम होत असल्याची टीका दोशी यांनी केली.