फाशीची शिक्षा झालेल्या सात कैद्यांनी इग्नूच्या एमबीए अभ्यासक्रमाला घेतला प्रवेश

Ignou
नवी दिल्ली – इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाच्या एमबीए अभ्यासक्रमाला फाशीची शिक्षा झालेल्या सात कैद्यांनी प्रवेश घेतला असून ही प्रवेश प्रक्रिया जानेवारी २०१८मध्ये पूर्ण झाली. ते सध्या याच्या दुसऱ्या सत्राला आहेत.

इग्नूने कैद्यांसाठी २०१० पासून अभ्यासक्रम सुरू केला. अनेक कैद्यांनी आतापर्यंत इग्नूच्या माध्यमातून पदवी, पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. जानेवारी महिन्यात यावर्षी एमबीएसाठी नऊ कैद्यांनी प्रवेश घेतला. त्यातील सात कैद्यांना फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. पण शिक्षण घेण्याची दुर्दम्य इच्छा असलेल्या या कैद्यांनी शिक्षण घेण्याचा मानस कायम ठेवला असून ते त्यासाठी विशेष मेहनत घेत आहेत.अनुसूचित जाती, जमाती, वारांगणा, तृतीयपंथी यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी ‘ज्ञानगंगा घरोघरी’ असे ब्रिद असलेल्या इग्नूच्यावतीने प्रादेशिक समन्वयक डॉ. पी. शिवस्वरूप विशेष प्रयत्न करीत आहेत. जानेवारी २०१९च्या सत्रासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख १५ नोव्हेंबर २०१८ आहे. प्रवेश परीक्षा १६ डिसेंबरला आयोजित करण्यात आली आहे.

१९९३च्या मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी याकूब मेननही इग्नूचा विद्यार्थी होता. येथील मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत असताना त्याने इग्नूच्या माध्यमातून इंग्रजी आणि राज्यशास्त्र विषयातून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले होते. एम.ए. इंग्रजीचा तो सुवर्णपदक विजेता विद्यार्थी होता.