बँक ऑफ महाराष्ट्रच्या ताब्यात गहुंजे स्टेडियम

bank-of-maharashtra
पुणे : एमसीएला बँक ऑफ महाराष्ट्रने नोटीस बजावली असून गहुंजे स्टेडियमसाठी एमसीएने बँक ऑफ महाराष्ट्रकडून कर्ज घेतले होते. त्याची साडे ६९ कोटी रक्कम थकवल्याप्रकरणी ही नोटीस बजावण्यात आली आहे. तसेच बँकेने ही रक्कम थकवल्याप्रकरणी स्टेडियम ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू केल्याचेही बँकेने नोटीशीत म्हटले आहे.

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने(एमसीए) हे मैदान बांधण्यासाठी बँक ऑफ महाराष्ट्रकडून कर्ज घेतले होते. पण कर्जाचे हफ्ते न भरल्यामुळे बँकेने ही कारवाई केली आहे. स्टेडियम बँक ऑफ महाराष्ट्रने ताब्यात घेतले असले तरी यामुळे इकडे होणाऱ्या क्रिकेटवर याचा कोणताही परिणाम होणार नसल्याचे एमसीएने सांगितले आहे.

एमसीएला बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ बडोदा, कर्नाटक बँक आणि आंध्र बँकेने कर्ज दिले होते. बँक ऑफ महाराष्ट्रने एमसीएला नोटीस या बँकांचे नेतृत्व करत असल्यामुळे पाठवली आहे. या मैदानाचा आम्ही प्रातिनिधिक ताबा घेत असल्याचे या नोटीशीत म्हटले आहे.