२०२१ मध्ये भारतीय बनावटीच्या ‘फाल्कन २०००’ चार्डर्ट जेटचे उड्डाण

falcon
नागपूर : लवकरच भारताच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला जाणार असून २०२१मध्ये पूर्णपणे भारतीय बनावटीचे स्वयंनिर्मित पहिले चार्टर्ड जेट “फाल्कन २०००’ हे उड्डाण करणार आहे. नागपूरच्या एसईझेडमधील अनिल धीरुभाई एरोस्पेस पार्कमध्ये या जेटची निर्मिती करण्यात आली आहे. नुकतेच या विमानाच्या कॉकपीटचे काम पूर्ण झाले आहे.

या जेटची निर्मिती डसॉल्ट आणि रिलायन्स यांची संयुक्त कंपनी डीआरएएलमध्ये करण्यात आली आहे. नागपूरच्या मिहान सेझमध्ये फ्रान्स आणि भारतीय तंत्रज्ञ जानेवारी २०१८पासून काम करत होते. फाल्कन २००० हे चार्टर्ड जेट २०२१मध्ये उड्डाण करेल, अशी माहिती मिहान एसईझेडच्या मुख्य जनसंपर्क अधिकारी दीपक जोशी यांनी दिली आहे.

कंपनीने पहिल्या टप्प्यात १० ते १८ आसनी ‘फाल्कन २०००’ या चार्टर्ड जेट विमानाच्या कॉकपीटचे काम पूर्ण केले. पुढील काम लवकरच सुरु केले जाणार असून डीआरएएल कंपनी २०२१मध्ये पूर्णपणे नागपुरात निर्मिती झालेले छोटे चार्टर्ड जेट उड्डाण करेल, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले. तसे झाल्यास जागतिक पातळीवर एव्हिएशन क्षेत्रात नागपूरचे लौकिक निर्माण होईल.