अंत्यविधीवेळी अचानक उठले ९५ वर्षांचे आजोबा

rajsthan
नवी दिल्ली – आपल्या घरातील व्यक्ती देवाघरी निघून गेल्यामुळे शोक करत असलेल्या एका कुटुंबात अचानक आनंदाचा क्षण आला आहे. कारण ९५ वर्षाच्या एका आजोबांना मृत घोषित केल्यानंतर त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. पण ते यादरम्यान अचानकपणे उठून बसले. राजस्थानमधील जयपूर येथील गुर्जर कुटुंबीयांच्या आनंदाला या अनोख्या गोष्टीमुळे पारावर राहीला नाही. अस्वस्थ वाटत असल्याने बुद्धराम गुर्जर यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्यांची तपासणी केल्यानंतर त्यांना मृत घोषित केल्यामुळे त्यांचे कुटुंबिय अतिशय दु:खात होते. आपल्या दूरच्या नातेवाईकांना त्यांनी बोलवून घेतले आणि अंत्यविधीची तयारीही केली.

बुद्धराम यांना त्यांचे काही विधी उरकून स्नानासाठी नेण्यात आले. तेव्हा त्यांचा श्वासोच्छवास काही मिनिटांतच सुरू झाला आणि ते अचानक जागे झाले. आपल्या घरातील ज्येष्ठ व्यक्तीचे निधन झाल्याने घरातील पुरुषांनी मुंडणही केले. ते अचानक उठून बसल्याने नातेवाइकांनी त्यांची चौकशी केली. तेव्हा त्यांनी छातीत दुखत असल्याने आपण झोपलो होतो असे सांगितले. हा एक प्रकारचा चमत्कारच असल्याचे त्यांचा मोठा मुलगा बाळू राम यांनी सांगितले. यंदाची दिवाळी आमच्यासाठी खऱ्या अर्थाने आनंदाची असल्याचेही ते यावेळी म्हणाले. आम्ही धुमधडाक्यात आता दिवाळी साजरी करणार असल्याचे त्यांचा धाकटा मुलगा रंजित म्हणाले.