सौदी पत्रकाराचे शरीर अॅसिडमध्ये विरघळवले

jamal-khagosshi
सौदी अरेबियाचे पत्रकार जमाल खशोगजी यांचा खून केल्यानंतर त्यांच्या अवयवांचे तुकडे करण्यात आले आणि त्यांचे शरीर आम्लामध्ये विरघळवण्यात आले, असा दावा तुर्कीच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी सांगितले. वॉशिंग्टन पोस्टचे पत्रकार असलेले जमाल खशोगजी यांची एक महिन्यापूर्वी तुर्कीतील सौदी वाणिज्य दूतावासात हत्या झाली होती.

“खशोगजी यांचे शरीर केवळ कापण्यात आले नाही, तर ते शरीर विरघळवून त्यांनी त्याची विल्हेवाट लावली,” असे तुर्कीचे अध्यक्ष रेसेप तैयिप एर्दोगान यांचे सल्लागार यासिन अक्टे यांनी.हूरियेट या स्थानिक वृत्तपत्राला सांगितल्याचे एएफपी वृत्तसंस्थेने म्हटले आहे. खशोगजी हे सौदी सरकारचे टीकाकार म्हणून ओळखले जात होते.

इस्तंबूलमधील सौदी अरेबियन दूतावासात 5 ऑक्टोबर रोजी 59 वर्षीय खशोगजी यांना स्थानबद्ध करण्यात आले होते. त्यानंतर त्यांची हत्या करण्यात आली होती. स्थानिक प्रसारमाध्यमांच्या अहवालानुसार, सऊदी अधिकाऱ्यांनी तुर्की पोलिसांना वाणिज्य दूतावासातील उद्यानातील एका विहिरीचा तपास करण्यास मनाई केली आहे, परंतु विश्लेषणासाठी पाण्याचे नमुने घेण्याची परवानगी दिली आहे.

तुर्कीच्या मुख्य अभियोजकांनी बुधवारी पुष्टी केली होती, की खशोगजी यांना नियोजित कटाचा एक भाग म्हणून 2 ऑक्टोबर रोजी दूतावासात प्रवेश मिळाल्याबरोबरच गळा दाबून मारण्यात आले होते आणि नंतर त्याचे शरीर नष्ट केले गेले.