चीनची पाकिस्तानला आर्थिक संकटातून सावरण्यासाठी ६ बिलियन डॉलरची मदत!

china
बीजिंग – शुक्रवारी चीनचे राष्ट्राध्यक्ष शि जिनपिंग यांच्यासोबत चीनच्या दौऱ्यावर असलेले पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी चर्चा असून चीन कर्जात बुडालेल्या पाकिस्तानला आर्थिक संकटातून सावरण्यासाठी ६ बिलियन डॉलरची आर्थिक मदत देण्याची शक्यता आहे. चीनकडून पाकिस्तानला ६ बिलियन डॉलरची मदत मिळणार असल्याचे पाकिस्तानच्या जीओ टीव्हीने म्हटले आहे.

यासोबतच पाकिस्तानला १.५ बिलियन डॉलरचे कर्जही चीन पुरवणार आहे. पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर(सीपीईसी) या महत्वकांक्षी प्रकल्पाला चालना देण्यासाठी चीनने पाकिस्तानला ३ बिलियन डॉलरचे पॅकेजदेखील जाहीर केले आहे. आंतरराष्ट्रीय संघटनांबरोबरच मित्रराष्ट्रांपुढेही कर्जबाजारी झालेल्या पाकिस्तानने आर्थिक संकटातून सावरण्यासाठी हात पसरले आहेत. त्यांना ६ बिलियन डॉलरची सौदी अरेबियाने मदत केली आहे. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय नाणेनिधी संघटनेकडे पाकिस्तानला बेलआऊट पॅकेज जाहीर करावे अशी मागणीही करण्यात आली आहे.

अमेरिकेचा आंतरराष्ट्रीय नाणेनिधी संघटनेत प्रभाव असून त्यांची मदत पाकिस्तानने घेतली तर अमेरिका सीपीईसीमध्ये खोडा घालू शकते, अशी भिती चीनला असल्यामुळेच वेळीच सावध झालेल्या चीनने खबरदारी म्हणून पाकिस्तानला सढळ हाताने मदत केली आहे. इम्रान खान यांनी या दौऱ्यात चीन – आशिया इन्फ्रास्ट्रक्चर इन्वेस्टमेंट बँकेचे प्रमुख जिन लिकन यांचीही भेट घेतली.

पाकिस्तानवर सीपीईसी प्रकल्पामुळे ६० बिलियन डॉलरचे कर्ज होणार असून ते सद्य़स्थितीत आम्हाला परवडणारे नाही, असा आक्षेप नुकताच इम्रान खान यांनी घेतला होता. त्यामुळे धाबे दणाणलेल्या चीनने या प्रकल्पातील पाकिस्तानची गुंतवणूक ८.२ बिलियन डॉलरवरुन ६.२ बिलियन डॉलरवर आणली होती.