वाघ, गेंड्यांच्या अवयवाच्या व्यापारीवरील बंदी चीनमध्ये मागे

tiger
वाघ आणि गेंड्यांसारख्या दुर्मिळ प्राण्यांच्या अवयवाच्या व्यापारीवरील बंदी चीन सरकारने मागे घेतली आहे. पर्यावरणवाद्यांनी या निर्णयावर खरपूस टीका केली आहे. तसेच या निर्णयामुळे भारतात या प्राण्यांच्या शिकारीत वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली आहे.

चीनमध्ये गेल्या 25 वर्षांपासून ही बंदी लागू होती. नव्या धोरणानुसार गेंड्यांचे शिंग आणि वाघाच्या हाडांचा उपयोग वैद्यकीय संशोधन आणि औषधनिर्मितीसाठी करण्यास मुभा देण्यात आली आहे, असे राज्य परिषदेने सोमवारी स्पष्ट केले.

गेंड्यांच्या शिंगांच्या पावडरचा उपयोग चीन व मध्यपूर्वेतील राष्ट्रांमध्ये विशेषकरून लैंगिक क्षमता वाढविण्यासाठी होतो. या पावडरचा वापर करुन तयार करण्यात आलेली औषधे शक्तीवर्धक आणि अनंत काळापर्यंत तारुण्य टिकवून ठेवतात, असा समज आहे. यासाठी वाघांच्या आणि गेंड्यांच्या शिकारी होतात.

“हा एक विध्वंसक निर्णय आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर या प्राण्यांची अधिक शिकार होईल आणि काळा बाजार होईल,” असे वन्यजीव निधीचे (डब्ल्यूडब्ल्यूएफ) संचालक लेघ हेन्री यांनी म्हटले आहे.

शिंगांच्या अवैध व्यापारासाठी गेंड्यांची खुलेआम शिकार होत आहे. हे प्रमाण गेल्या २० वर्षांत खूप वाढले आहे. ते असेच सुरू राहिले तर गेंडा जगभरातून नामशेष होईल, अशी भीती वन्यजीवप्रेमींनी यापूर्वीच व्यक्त केली आहे.

Leave a Comment