५० हजार पगार घेणाऱ्याने भरला २ कोटी आयकर

amrapali
नवी दिल्ली – सर्वोच्च न्यायालयाने आम्रपाली समुहाच्या मुख्य आर्थिक सल्लागाराच्या पगारात आणि आयकर रकमेत मोठ्या प्रमाणात फरक असल्याने आश्चर्य व्यक्त केले आहे. ५० हजार रुपये एवढा आम्रपाली समुहाच्या मुख्य आर्थिक सल्लागाराचा पगार असून आर्थिक सल्लागाराच्या नावे समुहाच्या सहयोगी बांधकाम कंपनीने तब्बल दोन कोटींचा आयकर भरला आहे. सर्वोच्च न्यायालयाने याप्रकरणी नेमलेल्या एका खासगी लेखा व्यवस्थापन संस्थेने हा अहवाल दिला आहे.

सर्वोच्च न्यायालयाला या संदर्भात माहिती देताना आम्रपाली समुहाने मुख्य आर्थिक सल्लागार चंदेर वाधवा यांना ४३ लाखांची अलिशान कार भेट दिल्याचे सांगितले. दरम्यान, वाधवा यांची न्यायमुर्ती अरुण मिश्रा आणि यू यू ललित यांच्या खंडपीठाने चौकशी केली आणि कंपनीकडून दिल्या जाणाऱ्या फायद्यासंदर्भातील सर्व बाबी स्पष्ट करण्याचे आदेश दिले.

प्रति महिना ५० हजार तुमचा पगार असताना तुमच्या कराची रक्कम म्हणून कंपनी २ कोटींची रक्कम का चुकवते? कंपनीकडून तुम्हाला नेमके कोणत्या प्रकारचे फायदे मिळतात? तुमची कंपनीतील नेमकी भुमिका काय? याबाबत उद्यापर्यंत स्पष्टीकरण देण्यास सांगितले आहे. वाधवा यांनी या प्रकरणी न्यायालयाची दिशाभूल करू नये. अन्यथा आम्हाला तुमच्याविरोधात कडक भुमिका घ्यावी लागेल असेही न्यायालयाने म्हटले आहे. याबरोबरच सक्तवसुली संचालनालयास (ईडी) याबाबत लक्ष घालण्याची सुचनाही न्यायालयाने केली आहे.

वाधवा यांना त्याचबरोबर आम्रपाली समुहाकडून मिळणाऱ्या सर्व आर्थिक स्रोतांसंदर्भात प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. आम्रपाली समुहाकडून सदनिका खरेदी केलेल्या खरेदीदारांकडून या संदर्भात विविध याचिका दाखल करण्यात आल्या होत्या.

Leave a Comment