हा ठरला देशातील दुसरा महाग घटस्फोट

cadilla
गुजरातमधील बडे उद्योजक आणि कॅडीला फार्मास्युटिकल कंपनीचे अध्यक्ष राजीव मोदी आणि त्यांची पत्नी मोनिका यांना न्यायालयाने घटस्फोट मंजूर केला असून हा भारतातील दुसरा महागडा घटस्फोट ठरला आहे. राजीव यांनी मोनिका यांना घटस्फोट देण्यासाठी २०० कोटी रु. दिले असल्याचे समजते. यापूर्वी बॉलीवूड अभिनेता ऋतिक रोशन याने पत्नी सुझन हिला घटस्फोट घेतल्यानंतर ४०० कोटी रु. दिले होते व तो देशातील सर्वात महाग घटस्फोट ठरला होता.

राजीव मोदी यांच्या कॅडीला फार्मास्युटिकल कंपनीची वार्षिक उलाढाल २ हजार कोटी रुपयांची आहे. मोनिका यांनी २०१८ मध्ये राजीव यांच्यावर व्यभिचारी असल्याची आणि मोनिका यांच्या जीवाला धोका असल्याचे तक्रार करून घटस्फोटाची मागणी केली होती. त्यावेळीच राजीव यांनी २०० कोटी रु. देण्याची तयारी दाखविली होती. यानंतर मोनिका यांचा राजीव याच्या संपत्तीवर कोणताही हक्क राहणार नाही. या जोडप्याचा १७ वर्षाचा मुलगा वडिलांकडे राहणार आहे.

राजीव आणि मोनिका यांचा विवाह १९९२ मध्ये झाला होता मात्र काही काळानंतर त्यांच्यामध्ये वाद सुरु झाले होते. मोनिका या मुंबईतील पॉलीएस्टर कंपनीचे अध्यक्ष शशिकांत गरवारे यांच्या कन्या आहेत आणि त्या कंपनीच्या उपाध्यक्ष व सहव्यवस्थापकीय संचालक आहेत. त्या १० कंपन्यांच्या डायरेक्टर बोर्डवर आहेत.

Leave a Comment