स्टॅच्यु ऑफ युनिटीची काही वैशिष्टे

sardaar
बुधवारी पंतप्रधान मोदी गुजराथेतील केवडिया येथे उभारल्या गेलेल्या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जगातील सर्वाधिक उंचीच्या स्टॅच्यु ऑफ युनिटीचे उद्घाटन करत आहेत. हा पुतळा राष्ट्राला समर्पित केला जाणार आहे. प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटेल अशी या पुतळ्याची काही खास वैशिष्टे आहेत ती खालीलप्रमाणे

हा पुतळा जगातील सर्वात उंच म्हणजे १८२ फुट उंचीचा आहे असा दावा या पुतळ्याच्या पायाभूत कामात सहभागी असलेल्या लार्सन अँड टुब्रो कंपनीने केला आहे. यात पुतळ्याच्या पायाची उंची ८० फुट, हाताची उंची ७० फुट, खांद्याची उंची १४० फुट, चेहरा ७० फुट असून त्याचे वजन आहे १७०० टन. या पुतळ्याला काश्याचा लेप दिला गेला असून फक्त हेच काम परदेशी मदतीने केले गेले आहे. बाकी सर्व काम स्वदेशी आहे.

हा पुतळा बनविण्यासाठी सल्लागार म्हणून काम करणारे राम सुतार महाराष्ट्रीय असून त्यांना २०१६ साली पद्मविभूषण सन्मान दिला गेला आहे. मुंबईत अरबी समुद्रात उभारल्या जाणार असलेल्या शिवाजी महाराज याच्या भव्य पुतळ्याचे काम सुतार यांच्याच देखरेखीखाली केले जाणार आहे.

स्टॅच्यु ऑफ युनिटी चीन मधील स्प्रिंग टेम्पल या बुद्ध पुतळ्यापेक्षा उंच असून बुद्ध पुतळा उभारायला ११ वर्षे लागली होती तर स्टॅच्यु ऑफ युनिटी रेकोर्ड ३३ महिन्यात उभारला गेला आहे. हे जागतिक रेकॉर्ड आहे. या पुतळ्यासाठी २९८९ कोटी खर्च झाला असून या पुतळ्यात दोन हाय स्पीड लिफ्ट बसविल्या गेल्या आहेत. यातून एकावेळी ४० माणसे जाऊ शकणार आहेत. दररोज अंदाजे १५ हजार पर्यटक येथे भेट देतील असे अनुमान वर्तविले गेले आहे.