शरद पवारांचे नातू रोहित पवार यांचा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

rohit-pawar
मुंबई : शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी ‘सामना’च्या अग्रलेखातून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अजित पवार यांच्यावर केलेल्या टिप्पणीनंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे. बाळासाहेब ठाकरे अखेरच्या क्षणी आमच्या उद्धवला सांभाळा, असे का म्हणाले होते याचा अर्थ आता समजला. संपादकीय लिहिण्याऐवजी दोन ओळीचा राजीनामा लिहिला असता वडिलांप्रमाणे आपल्याला ताठ कणा आहे, हे महाराष्ट्राला पाहायला मिळाले असते, असे रोहित पवार म्हणाले.

अजित पवार यांनी मागील बुधवारी (२४ ऑक्टोबर) जालन्यातील एका कार्यक्रमात अयोध्येत राममंदिर उभारण्याच्या शिवसेनेच्या भूमिकेवरुन उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. बापाचे स्मारक पाच वर्षांमध्ये बांधता आले नाही ते राम मंदिर काय बांधणार?, असा खोचक सवाल अजित पवार यांनी केला होता. या विधानाचा ‘सामना’च्या अग्रलेखातून उद्धव ठाकरेंनी समाचार घेतला. महाराष्ट्राच्या राजकारणात अजित पवार या माणसाला काडीमात्र किंमत नाही. काकांच्या पुण्याईने व कृपेनेच ते तरले आहेत. हे महाशय अधूनमधून शेतकऱ्यांचे प्रश्न, दुष्काळी परिस्थिती यावर त्यांच्या ‘मुतऱ्या’ थोबाडाने बोलत असतात, अशा शब्दात ‘सामना’च्या अग्रलेखात टीका केली होती.

यानंतर उद्धव ठाकरेंना रोहित पवार यांनी लक्ष्य करत फेसबुकवर पोस्ट लिहिली आहे. ते म्हणतात, अखेरच्या क्षणी बाळासाहेब म्हणाले होते, आमच्या उद्धवला सांभाळा! त्या सांभाळाचा अर्थ काल समजला, त्याचा अर्थ आमचा मुलगा अल्लड आहे त्याला सांभाळून घ्या असाच असावा. बाळासाहेब हुशार होते, भाषेवर प्रभुत्व असणारे मोठ्ठे नेते होते. मार्मिक असो कि सामना त्यांनी टिका देखील जहाल केली, पण त्यांच्या नावाने राजकारण करणाऱ्यांनी गरळ ओकून त्यांच्याच लेखणीचा अपमान केला. उद्धव ठाकरे कधी लोकांच्यातून निवडून आले नाहीत की मातोश्रीच्या बाहेर पडून उभा महाराष्ट्र पाहण्याचे देखील साधे कष्ट घेतले नाही. महाराष्ट्र जळत असताना हे महाशय सत्तेत भागीदार होवून सर्वसामान्यांना भुलवण्याचे काम करत आहेत. इतका लेख लिहण्याच्या ऐवजी दोन ओळींचा राजीनामा दिला असता तरी आपल्या वडिलांप्रमाणे आपला ताठ कणा महाराष्ट्राला पहायला मिळाला असता.

राष्ट्रवादी काँग्रेस सर्वेसर्वा शरद पवार यांचे पुतणे राजेंद्र पवार यांचे रोहित पवार हे पुत्र आहेत. शरद पवारांचे मोठे बंधू आप्पासाहेब यांचे नातू रोहित आहेत. रोहित पवार सध्या बारामती जिल्हा परिषद सदस्य आहेत.

Leave a Comment