मोदी सरकार आगामी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत सत्तेत येणार नाही – संजय राऊत

sanjay-raut
रायगड- जनतेला दिलेली आश्वासने भाजप सरकारने पाळली नसल्यामुळे जनतेचा भ्रमनिरास झाला आहे. त्यामुळे मोदी सरकार आगामी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत सत्तेत येणार नाही. त्याचबरोबर शिवसेनेचाच मुख्यमंत्री महाराष्ट्रातही असेल, असे रोखठोक प्रतिपादन खासदार संजय राऊत यांनी केले आहे.

संजय राऊत यांच्या प्रकट मुलाखतीचा कार्यक्रम अलिबाग प्रेस असोसिएशनच्या दहाव्या वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर जे.एस.एम. कॉलेजच्या केळूसकर सभागृहात घेण्यात आला. राऊत यांची मुलाखत प्रसिद्ध निवेदक संजय भुस्कूटे यांनी घेतली.

भाजपवर यावेळी संजय राऊत यांनी चौफेर टीका केली. ज्या राम मंदिराचा मुद्दा घेऊन मोदी सरकार निवडणूक लढले, तो मुद्दा ४ वर्षात मागे पडला. सरकारने पूर्ण बहुमत मिळूनही जनतेचा भ्रमनिरास केला. देशात आज अनेक प्रश्न भेडसावत आहेत. भाजपला पाशवी बहुमत हे प्रश्न सुटावे म्हणूनच मिळाले, पण ४ वर्षात भाजपने कोणतीही ठोस कामे केली नाहीत. आगामी निवडणुकीत राम मंदिराचा मुद्दा प्रचारात येऊ नये ही आमची भूमिका असल्यामुळे आम्ही राम मंदिराचा मुद्दा सध्या उचलून धरला आहे.

महाराष्ट्राला दिल्लीची हवा कधीच मानवली नाही. त्यांनी त्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचाही दाखला दिला. शरद पवार हे महाराष्ट्राचे मोठे नेते आहेत. ते पंतप्रधान होतील, असे आम्हाला गेल्या ३० वर्षांपासून वाटत होते. पण तसे झाले नाही. आगामी निवडणूकीत त्यांच्या पक्षाचे ६ ते ७ खासदारच निवडून येतील, असे संजय राऊत यांनी ठामपणे सांगितले.

संजय राऊत आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बोलताना, सध्या पाशवी बहुमतावर सत्तेत असलेल्या भाजपचे संख्याबळ किमान १०० ने घटेल, असा दावाही केला. प्रादेशिक पक्ष एकत्र येणे काही गैर नाही. या प्रादेशिक पक्षांचे महत्व वाढेल आणि एकत्र येऊन महत्वपूर्ण निर्णय घेऊ शकतील.

प्रकल्प कोकणात आले पाहिजेत परंतु जनता उध्वस्त होणार असेल तर आमचा विरोध राहिल. जनतेचा नाणारला येथील विरोध असल्यामुळे जनतेच्या सोबत आम्ही आहोत. तेथील जनतेने जर नाणारला समर्थन दिले तर आमची भूमिका वेगळी असेल. कोणत्याही प्रकल्पाला आमचा विरोधी नाही, तर तेथील विस्थापनाला आणि उद्भवणार्‍या समस्यांना विरोध राहिल, असे राऊत स्पष्ट केले.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल संजय राऊत यांनी आदराची भूमिका मांडली. त्यांनी त्यांचे मोठेपणही मान्य केले. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांच्या मैत्रीवरही त्यांनी प्रकाश टाकला. राऊत यांच्या सर्वांगीण आयुष्यावर, राजकीय, पत्रकारिता, त्यांचा व्यासंग या सर्वांवर निवेदक संजय भुस्कूटे यांनी प्रकाश झोत टाकला. राऊत यांनी चित्रपटाची आपली आवड उघडपणे व्यक्त केली. बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर प्रदर्शित होणार्‍या आगामी चित्रपटाबद्दल भूमिका मांडली.

Leave a Comment