नवी दिल्ली – आता शहरांमध्ये कॅबने प्रवास करणे सामान्य बाब झाली असल्यामुळे ओला आणि उबर सारख्या कॅब सर्व्हिस देणाऱ्या कंपन्या चांगल्याच लोकप्रिय झाल्या आहेत. या कंपन्यांनी गेल्या एका वर्षात प्रवास भाड्यात १५ टक्क्यांनी वाढ केल्याचे एका अहवालात म्हटले आहे. हा अहवाल रेडसिर नावाच्या एका संस्थेने सर्व्हेक्षणाच्या आधारे प्रसिद्ध केला आहे.
ओला-उबेरच्या प्रवास भाड्यात एका वर्षात १५ टक्क्यांनी वाढ
रेडसिरचे म्हणणे आहे, की कंपन्यांनी २०१७ मध्ये प्रवास भाड्यात १० टक्के वाढ केली होती. पण या आकड्यांमध्ये शहरांनुसार फरक पाहायला मिळू शकतो. बंगळुरूच्या कॅब यूझर्सचे म्हणणे आहे, की प्रवास भाड्यात वाढ झाली आहे. मात्र, रेडसिर संस्थेने शहरांनुसार आकडे सादर केलेले नाहीत. अहवालानुसार राईडसाठी कंपन्या पहले १९० रुपये आकारत होते. आता मात्र २२० रुपये भाडे घेण्यात येत आहे. कॅबचालक मात्र कंपनीच्या भूमिकेमुळे संतुष्ट नाहीत. उत्पन्न आणि प्रोत्साहन पर भत्ता या मुद्द्यांवरुन मुंबई आणि दिल्लीत ओला आणि उबरच्या ड्रायव्हर्सनी मंगळवारी आंदोलन केले होते.
अहवालानुसार २०१६ च्या दुसऱ्या तिमाहित ड्रायव्हर्सचे सरासरी उत्पन्न ३० हजार रुपये होते. मात्र आता ते २० हजार रुपये आहे. पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीचा ही परिणामही यावर झालेला आहे. दोन वर्षांपूर्वी इन्सेंटिव्ह, बुकिंग व्हल्यूच्या ६० टक्के होते. गेल्यावर्षी हा आकडा १८ आणि २० टक्क्यांवर घसरला. आता हा १४-१५ टक्क्यांवर आला आहे. रेडसिरनुसार इंधन दरवाढ आणि देखरेखीचा खर्च वाढल्याने ड्रायव्हर्सवर ७०० रुपयांचा अतिरिक्त बोजा पडत आहे.